नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. लवकरच केंद्र सरकारकडून हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यानच्या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. 


संसदीय कामकाजाशी संबंधित कॅबिनेट कमिटीकडून याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. पण यावर्षी देशातील कोरोनाचे संकटात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हिवाळी अधिवेशन घेण्यास कोणतीही अडचण नाही. या वर्षी राज्यसभा आणि लोकसभा यांच्या बैठकी एकाच वेळी होणार आहेत. 


या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेलं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं होतं. पेगॅसस आणि  नव्या कृषी कायद्यावरुन विरोधकांनी सरकारवर चांगलीच टीका केली आणि संसदेत त्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यावरुन लोकसभेत आणि राज्यसभेत चांगलाच गदारोळ माजला होता. राज्यसभेतील अभूतपूर्व गोंधळानंतर ते सभागृह आहे की कुस्तीचा आखाडा असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली होती. सभागृहात खासदारांऐवजी मार्शल्सची संख्या जास्त दिसत होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या गोंधळावरुन आरोप प्रत्यारोप सुरु होते. संसदेचं अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या काळापर्यंत प्रस्तावित होतं. पण सरकारनं ते दोन दिवस आधीच गुंडाळलं. त्यातही अशा अभूतपूर्व गोंधळातच या अधिवेशनाचा समारोप झाला होता.


त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारला विविध प्रश्नावरुन घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या :