नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी आज संसदेच्या कामकाजावर जोरदार टीका केली आहे. संसदेत कामकाजादरम्यान योग्य चर्चा होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. रमना यांनी सध्याच्या संसदेची तुलना पूर्वीच्या संसदेशी केली आणि सांगितले की पूर्वी संसदेची दोन्ही सभागृहे वकिलांनी भरलेली असायची. वकिलांनी लोकसेवेसाठी संसदेत वेळ घालवायला हवा, असंही त्यांनी सांगितले आहे.
सरन्यायाधीश रमना यांनी म्हटलं की, पूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सकारात्मक आणि समंजसपणे व्हायची. प्रत्येक कायद्यावर विशेष चर्चा होत असे. पण आता संसदेने केलेल्या कायद्यांमध्ये मोकळेपणा नाही. संसदेच्या कायद्यांमध्ये स्पष्टता राहिली नाही. संसदेत जे कायदे तयार होतात त्याचा काय हेतू आहे, हेच आम्हाला कळत नाही. ही स्थिती जनतेसाठी हानिकारक आहे. याचे कारण वकील आणि विचारवंत सभागृहात नाहीत, असं सरन्यायाधीश रमना यांनी म्हटलं.
जर आपण आपल्या स्वातंत्र्य सेनानींकडे पाहिले तर त्यापैकी बरेच जण कायद्याशी जोडलेले होते. लोकसभा आणि राज्यसभेचे पहिले सदस्य वकिलांच्या समुदायाने भरलेले होते. त्यामुळे चर्चा सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण होत असे. सर्वोच्च न्यायालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकवल्यानंतर सरन्यायाधीशांनी यावर भाष्य केले.
कोणत्याही कायद्याशी संबंधित वाद विवाद करताना न्यायाधीशांनी सभागृहाचा हेतू समजून घेणे महत्त्वाचे आहे. असे करण्यात अपयश आल्यामुळे काम करणे अधिक कठीण होते. आता सभागृहांमध्ये जे घडत आहे ते दुर्दैवी आहे. पूर्वी सभागृहातील वादविवाद अतिशय विधायक आणि सकारात्मक असायचा, असंही त्यांनी म्हटलं.
मी आर्थिक बिलांवर सभागृहातील चर्चा पाहिली आहे. खूप विधायक मुद्दे उपस्थित केले जात. कायद्यांवर चर्चा झाली. मला वकिलांना सांगायचे आहे की तुम्ही स्वतःला कायदेशीर सेवेपुरते मर्यादित करू नका. लोकसेवा सुद्धा करा. या देशाला आपले ज्ञान आणि शहाणपण द्या, असं सरन्यायाधीर एन व्ही रमना यांनी म्हटलं.