अपत्यहीन दाम्पत्यांसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र, आयव्हीएफ पद्धत केवळ मनुष्यांसाठी मर्यादीत राहिलेली नसून जनावरांवरही याचा प्रयोग करण्यात आला आहे. दरम्यान, जनावरांवर करण्यात आलेल्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा (IVF Calf ) प्रयोग यशस्वी ठरला आहे.  गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील धनेज येथे बन्नी जातीच्या एका म्हशीने आयव्हीएफ पद्धतीने रेडकुला जन्म दिला आहे. विनय नावाच्या शेतकऱ्याकडे 6 बन्नी जातीच्या म्हशी आहेत. त्यापैकी एका म्हशीने आयव्हीएफ पद्धतीने रेडकूला जन्म दिला आहे. तसेच देशातील हे पहिले बन्नी म्हैस आयव्हीएफ रेडकू आहे. (India’s First Banni Buffalo IVF Calf Born)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 डिसेंबर 2020 रोजी गुजरातमधील कच्छ प्रदेशाच्या भेटीदरम्यान बन्नी म्हशीच्या जातीबद्दल बोलले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, 16 डिसेंबर 2020 रोजी, आयव्हीएफ तंत्रज्ञानावर भर देण्यात आली. शास्त्रज्ञांनी विनयच्या सुशीला ऍग्रो फार्मच्या 3 बन्नी म्हशींची आयव्हीएफ पद्धतीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यापैकी एका म्हशीने पहिल्याच आयव्हीएफ बन्नी रेडकूला आज जन्म दिला आहे. देशातील पशुसंपत्ती सुधारण्यासाठी सरकार म्हशींच्या आयव्हीएफ पद्धतीला प्रोत्साहन देते. 

 

परभणी कृषि विद्यापीठातील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांनी  दिलेल्या माहितीनुसार, आयव्हीएफ पद्धतीचा देशातील दुग्ध उत्पादन वाढण्यास मोठी मदत होऊ शकेल. देशातील देशी जनावरे आणि म्हशींच्या जातींचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या दुधात आजारांशी लढण्यासाठी उच्च पौष्टिक मूल्ये असतात. भारतात दुग्धजन्य उत्पादनांमध्ये वाढ झाल्याने खेड्यांमध्ये अधिक प्रगती होऊ शकेल. या उपक्रमाचे शेतकरी स्वागत करीत आहेत. भविष्यात दूध वाढीसाठी याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य उंचावणार आहे. वाढत्या लोकसंख्येला या उपक्रमामुळे दुधाचा तुटवडा जाणवणार नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे शेतीत विविध प्रयोग होत आहेत. दुग्धक्षेत्रात नव्याने प्रयोग होऊ लागल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असे सध्यातरी या आयव्हीएफच्या प्रयोगातून दिसून येत आहे.

 

जगात सर्वाधिक म्हशींची लोकसंख्या भारतात आहे. देशाचा एक भाग म्हशींच्या संगोपनाशी संबंधित आहे. भारतात म्हशींच्या 26 जाती आहेत. त्यापैकी म्हशींच्या 12 जाती नोंदणीकृत आहेत, ज्या जास्तीत जास्त दूध देतात. यामध्ये मुऱ्हा, निलीरावी, जाफराबादि, नागपुरी, पंढरपुरी, बन्नी, भदावरी, चिलका, मेहसाणा, सुरती, टोडा या जातीच्या म्हशींचा समावेश आहे.