नवी दिल्ली मंगळवारी केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas Price) दरात 200 रुपयांनी कपात केल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी भाजपने हा निर्णय सामान्यांच्या हिताचा असल्याचे सांगत देशभरातील भगिनींना दिलासा दिला असल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनाते यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 


185 टक्क्यांनी दरवाढ; कपात फक्त 17.5 टक्क्यांची


केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षांत एलपीजीच्या किंमतीत 185 टक्क्यांनी वाढ केली आणि आता ती केवळ 17.5 टक्क्यांनी कमी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गेल्या साडे नऊ वर्षांत केंद्र सरकारने इंधनावरील कर वाढवून 30 लाख कोटी रुपयांचा नफा कमावल्याचा दावाही सुप्रिया श्रीनाते यांनी केला.


मंगळवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.


काँग्रेसने जारी केला व्हिडीओ 


सुप्रिया श्रीनाते यांनी आज एक व्हिडीओ जारी केला आहे. विरोधी पक्षांची आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स'च्या  (INDIA) दबावामुळे सरकारला स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ करणे भाग पडले असल्याचे श्रीनाते यांनी म्हटले. स्वयंपाकाच्या गॅसच्या दराचा भडका उडवणारे आज दरात कपात करण्यास बाध्य झाले आहेत. ही 'इंडिया'ची ताकद असल्याचे त्यांनी म्हटले. 


देशात स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 2014 मध्ये 400 रुपये प्रति सिलिंडर होती. हीच किंमत 2023 मध्ये 1140 रुपये झाली आहे. या नऊ वर्षांमध्ये सिलिंडरच्या किंमतीत 185 टक्क्यांनी वाढली आहे. आता ऑगस्ट 2023 मध्ये एलपीजीच्या किमती 17.5 टक्क्यांनी कमी झाल्या.






सरकारचा दिलासा नाहीच; काँग्रेसचा आरोप


भारतात एलपीजी गॅसचा दर हा 'सौदी अरामको'चे एलपीजी दर, डॉलर आणि रुपयाच्या आधारावर निश्चित केले जातात. सौदी अरामकोच्या LPG किमतीनुसार, जानेवारी 2014 मध्ये LPG ची किंमत 1010 डॉलर प्रति मेट्रिक टन होती. जानेवारी 2023 मध्ये 590 डॉलर प्रति मेट्रिक टन  इतकी झाली. ऑगस्ट 2023 मध्ये एलपीजीची किंमत प्रति मेट्रिक टन 470 डॉलर होती. 


बाजारात एलपीजी गॅसच्या दरात घट होत असताना केंद्र सरकारकडून जनतेला कोणताच दिलासा मिळाला नाही. बाजारात घटलेल्या एलपीजी दराचा फायदा जनतेला देता आला असता. मात्र, सरकारने कोणताच दिलासा दिला नसल्याचे सुप्रिया श्रीनाते यांनी म्हटले.