Parliament : लोकसभेत (Lok Sabha) घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या चार जणांना चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. लोकसभेत पकडले गेलेले सागर शर्मा आणि डी मनोरंजन आणि संसदेबाहेर अटक करण्यात आलेले नीलम देवी आणि अमोल शिंदे यांची सविस्तर चौकशी करावी लागेल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. 


लोकसभेचं कामकाज सुरू असताना घडली घटना


लोकसभेचं कामकाज सुरू असताना  अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटकांनी पकडलं. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. खासदारार प्रताप सिम्हा हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्याच शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता त्यामुळे या अनुशंगानेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.


संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी समिती


संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे (parliament security breach) आदेश केंद्रीय गृह खात्यानं (MHA ) दिले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग (Anish Dayal Singh) यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाईल. अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख देखील या चौकशी समितीत असतील. ही समिती घटनेची कारणं शोधून काढेल, तसंच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत देखील शिफारसी करेल. केंद्रीय गृह खात्यानं अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल.