Parliament Monsoon Session 2023: मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. मणिपूर हिंसाचारावर मोदींनी निवेदन द्यावं, अशी मागणी काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनी केली आहे.


विरोधक दाखल करणार अविश्वास प्रस्ताव


मणिपूर हिंसाचारावरुन विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक झाले आहेत. विरोधक लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी अविश्वास प्रस्तावावर विविध नेत्यांच्या सह्या घेतल्या आहेत. मंगळवारीच विरोधक सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या विचारात असल्याचं आपचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितलं होतं. 


दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार तहकूब


मणिपूर हिंसाचारावरुन लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर संसदेत निवेदन न केल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेत काँग्रेससह विरोधक आक्रमक झाले आहेत. या सगळ्या दरम्यान आपचे नेते संजय सिंह यांनी सोमवारी (24 जुलै) सभागृहात निदर्शन केल्यामुळे त्यांचं राज्यसभा सभापतींनी निलंबन केलं आणि त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले. मणिपूर मुद्द्यावरुन सभागृहांत गोंधळ सुरू असून सभागृह वारंवार तहकूब केले जात आहेत.


मंगळवारी पार पडली विरोधी पक्षांची बैठक


मणिपूरच्या मुद्द्यावरुन अधिवेशनात दररोज गदारोळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या संसदेत कोणत्याच मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवार (25 जुलै) रोजी याच मुद्द्यावर इंडियामध्ये सामील असलेल्या विरोधी पक्षांची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच बैठकीमध्ये मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


केंद्र सरकार चर्चेला तयार, मात्र विरोधक पळ काढतात


मणिपूर हिंसाचार प्रकरणांवर सरकार विरोधकांसोबत चर्चा करण्यास तयार आहे, असं भाजप नेते म्हणत आहेत. मात्र विरोधक सभागृहातून पळ काढत असल्याचा आरोपही भाजपने केला. महिला अत्याचाराच्या प्रकरणावरुन संसदेत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हणाले. मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप गोयल यांनी केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Uddhav Thackeray: मोदी सरकार 2024 मध्ये पुन्हा सत्तेत आलं तर लोकशाही राहणार नाही : उद्धव ठाकरे