मुंबई/पुणे- लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारीअर्ज भरल्यामुळे उमेदवारांची अधिकृत संपत्ती जाहीर होत आहे. त्यामध्ये, गडगंज संपत्तीचे मालक असलेल्या उमेदवारांची मालमत्ता सार्वजनिक होत असून भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पल्लवी डेम्पो यांची संपत्ती नक्कीच भुवया उंचावणारी आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील उदयनराजे भोसले आणि शाहू छत्रपती यांच्या संपत्तीपेक्षाही जास्त डेम्पो यांची संपत्ती आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातून पल्लवी डेम्पो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत, दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती तब्बल 1400 कोटी रुपयांची आहे. त्यात, विदेशात बंगले, लग्झरी कार, सोने-नाणे आणि कोट्यवधींचे बाँड आहेत. 


दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपने उद्योजक श्रीनिवास डेम्पो यांच्या पत्नी पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी दिली आहे. पल्लवी यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते.पल्लवी यांनी दाखल केलेल्या 119 पानांच्या प्रतिज्ञापत्रात पती श्रीनिवास ढेम्पो यांच्यासह पल्लवी यांची एकूण संपत्ती सुमारे 1,400 कोटी रुपये आहे. डेम्पो ग्रुपचा व्यवसाय फ्रँचायझी फुटबॉल लीगपासून, रिअल इस्टेट, जहाजबांधणी, शिक्षण आणि खाण क्षेत्रात विस्तारलेला आहे. दरम्यान, 49 वर्षीय भाजप उमेदवार पल्लवी डेम्पो यांनी एमआयटी, पुणे विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 


गोवा राज्यातील लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या 2 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.


कोट्यवधींच्या लग्झरी कार


पल्लवी यांच्याकडे वेगवेगळ्या सीरिजच्या तीन मर्सिडीज बेंझ कार आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 1.69 कोटी, 16.42 लाख, 21.73 लाख रुपये आहे. कॅडिलॅक कार आहे, ज्याची किंमत ३० लाख आहे.तसेच, महिंद्रा थार एसयूव्ही, ज्याची किंमत 16.26 लाख रुपये आहे. 


दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट


पल्लवी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे दिसून येते, तर श्रीनिवास यांच्या मालकीच्या मालमत्तेचे मूल्य 994.8 कोटी रुपये आहे. पल्लवी यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 28.2 कोटी रुपये आहे, तर श्रीनिवास यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण बाजारमूल्य 83.2 कोटी रुपये आहे. श्रीनिवास डेम्पो यांच्या गोवा आणि देशाच्या इतर भागांतही मालमत्ता असून या जोडप्यांकडे दुबईत एक अपार्टमेंट देखील आहे, ज्याचे सध्याचे बाजार मूल्य २.५ कोटी रुपये आहे. तर, लंडनमध्येही 10 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.


5.7 कोटींचे सोने


पल्लवी यांच्याकडे 5.7 कोटी रुपयांचे सोने असून त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 10 कोटी रुपयांचे आयकर रिटर्न भरले आहे, तर श्रीनिवास यांनी त्याच वर्षी 11 कोटी रुपयांचे रिटर्न भरले आहेत.


217.11 कोटी रुपयांचे रोखे


पल्लवीकडे 217.11 कोटी रुपयांचे रोखे, 12.92 कोटी रुपयांची बचत आणि सुमारे 9.75कोटी रुपयांच्या इतर गोष्टी आहेत.