जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुँछ भागात पाकिस्तानानं गोळीबाराबरोबरच थेट मिसाईलनं हल्ला चढवला आहे. यात एका कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले आहेत. तर २ स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत. सध्या नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे.


दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. शहीद जवानांमध्ये कॅप्टन कपील कूंडू, जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल यांचा समावेश आहे. तर, लान्स नायक इक्बाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

शाळांना तीन दिवस सुट्टी

काल रात्रीपासून सुरु असलेल्या गोळीबारामुळे राजौरी येथील प्रशासनाने नियंत्रण रेषेच्या जवळील 84 शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील गावातील लोकांनाही सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सुरु आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन

या वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून यामध्ये 9 जवानांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 लोक जखमी झाले आहेत. 2017 साली पाकिस्ताननं तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं.