Weather Update News : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Hevay Rain) कोसळत आहे. उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळं यंदाची अमरनाथ यात्रा देखील काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस आणि भूस्खलनामुळे पुढे ढकलावी लागली आहे.


देशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता


सध्या उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. भारतीय हवामान विभागाने  देशातील अनेक भागांमध्ये  मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड, राजस्थान (पूर्व), जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


पश्चिम भारतात मुसळधार पावसाची शक्यता


भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 11 जुलैपर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमधील घाट भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


उत्तर-पश्चिम भारतातील हवामान परिस्थिती


हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 10 जुलै दरम्यान, पुढील पाच दिवस पंजाब, हरियाणा-चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचण्याची शक्यता आहे.


हिमाचल प्रदेशातही अलर्ट


हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. राज्यात 13 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कांगडा, चंबा, शिमला, मंडी, कुल्लू, सिरमौर, सोलन आणि उना जिल्ह्यातील नद्यांना पूर येण्याच्या शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 


पूर्व आणि ईशान्य भारतात काय स्थिती


पुढील पाच दिवसात उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसाम आणि मेघालय, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. बिहारमध्ये 9 ते 12 जुलै दरम्यान, झारखंडमध्ये 11 ते 12 जुलै दरम्यान आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 8 ते 10 जुलै दरम्यान खराब हवामानाची शक्यता आहे.


मध्य आणि दक्षिण भारतातील हवामानाची स्थिती


पुढील पाच दिवसांत कर्नाटकात काही भागात हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मध्य भारतातील विविध राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यातील काही भागात चांगला पाऊस, कोकणात पावसाचा जोर कमी होणार