Pakistani Drone : पंजाबमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलांनी पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडला आहे. पंजाबमधल्या तरणतारण पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाईत हा क्वाडकॉप्टर ड्रोन पाडला आहे. सुरक्षा दलांनी ड्रोनसह तीन किलो हेरॉईन देखील जप्त केली आहे. सुरक्षा दलांनी 3 डिसेंबरला ही संयुक्त कारवाई केली. डीजीपी पंजाब गौरव यादव यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11 वाजता भारत-पाकिस्तान सीमेवरील तरनतारन येथे ड्रोनची हालचाल दिसली. यावेळी 103 बटालियनचे सैनिक बाहेरील भागात तैनात होते. ड्रोनचा आवाज ऐकताच त्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर आवाज येणे बंद झाला. रात्री शोधमोहिमेत काहीही मिळाले नाही. सकाळी पुन्हा संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, त्यात शेतात पडलेले ड्रोन सापडले. ड्रोनसोबत हेरॉईनची खेपही जप्त करण्यात आली आहे. ही हेरॉईन ड्रोनवर बांधण्यात आली होती.


फाजिल्का येथेही ड्रोन पाडण्यात आले


तत्पूर्वी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात शुक्रवारी रात्री एक ड्रोन पाडला होता. बीएसएफ आणि पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी सकाळी शोधमोहीम राबवली असता एका शेतातून पाच किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याची किंमत 25 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेरॉईनची ही खेप पाकिस्तानी ड्रोनमधून पाठवण्यात आली होती. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, माल जप्त करण्यासाठी आलेल्या तीन ते चार संशयितांच्या हालचाली पाहून बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत माहिती देताना बीएसएफने सांगितले की, शुक्रवारी दुपारी 12.05 वाजता चुडीवाला चुस्ती गावाजवळ पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत घुसल्याचा आवाज जवानांना ऐकू आला. यानंतर सुरक्षा दलांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला, त्यानंतर ड्रोन परत पाकिस्तानच्या दिशेने गेला. याबाबत बीएसएफने ट्वीट केले आहे. परिसरात शोध घेतला असता ड्रोनसोबत बांधलेले 30 पॅकेटमध्ये भरलेले 25 किलो हेरॉईन सापडले. याशिवाय एक पिस्तूल, दोन मॅगझिन आणि 9 एमएमची 50 काडतुसेही सापडली आहेत. बीएसएफने सांगितले की, बीएसएफ जवानांच्या सतर्कतेमुळे अमली पदार्थांच्या तस्करीचा देशविरोधी घटकांचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


नागपुरातून दुपारी साडेबाराला निघाले अन् सायंकाळी सव्वा पाचला शिर्डीत पोहोचले; जेवण केलं, सत्कार स्विकारत पावणेपाच तासात 529 किमी अंतर पार