Tarek Fatah Demise: पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह (Tarek Fatah) यांचं आज निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. ते 73 वर्षांचे होते. तारिक फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. इस्लाम धर्माशी निगडीत असलेल्या मुद्यांवर ते आक्रमकपणे भूमिका मांडत असे.
तारेख फतेह यांची कन्या नताशा यांनी ट्वीट करून म्हटले की, पंजाबचा वाघ, हिंदुस्तानचा मुलगा, कॅनडा प्रेमी, सत्य वक्ता आणि न्यायाच्या बाजूचा योद्धा तारेख फतेह यांचं निधन झाले. त्यांचे विचार लोकांच्या माध्यमातून जिवंत राहतील असेही नताशा यांनी म्हटले.
तारेख फतेह यांचा जन्म 1949 मध्ये कराची येथे झाला होता. त्यांचे कुटुंबीय हे मुंबईत वास्तव्य करणारे होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कराची गाठले आणि स्थायिक झाले.
तारेक फतेह हे स्वत:ला भारतीय असल्याचे सांगत असे. पाकिस्तानदेखील भारतीय संस्कृतीचा हिस्सा असल्याचे ते सांगत असे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली फाळणी ही चुकीची होती, दोन्ही देशाची एकच संस्कृती असल्याची भूमिका ते मांडत असे. धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या फतेह यांनी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांना जोडणारा दुवा हा येथील संस्कृती असल्याचे ते सांगत असे.
केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारचे त्यांनी अनेकदा कौतुक केले होते. त्याशिवाय, इस्लाम आणि दहशतवादाच्या मुद्यावर घेत असलेल्या भूमिकेसाठी त्यांची ओळख निर्माण झाली होती. भारतातही वृत्तवाहिन्यांवर त्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
कराचीत जन्म झालेल्या फतेह यांनी पाकिस्तानमध्ये शोध पत्रकारिता केली होती. 1970 मध्ये त्यांनी सन नावाच्या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिता केली. त्यांना दोन वेळेस तुरुंगातही जावं लागलं होते. त्यानंतर पाकिस्तानमधून ते सौदी अरेबियात स्थायिक झाले. त्यानंतर
1987 मध्ये कॅनडा गाठलं आणि तिथेच स्थायिक झाले. पत्रकार म्हणून सुरुवात करणारे फतेह हे स्तंभलेखक होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांवर चर्चा झडत असे. सोशल मीडियावर त्यांचा खास चाहता वर्ग होता.
हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी आणि अरबी आदी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. तारिक फतेह यांना मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून देखील ओळखले जात असे.