Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात 26 पर्यटक ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा एक गट 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर कमांडर सैफुल्लाहने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यानंतर, द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने देखील एक निवेदन जारी करत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. 

द रेझिस्टन्स फ्रंट (TRP) पहलगाम घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारते. हल्ल्यासाठी टीआरएफला दोष देणे चुकीचे आहे. हा घाईघाईत घेतलेला निर्णय आहे. काश्मिरी प्रतिकाराला बदनाम करण्यासाठी हे सुनियोजित मोहिमेचा एक भाग आहे, असे टीआरएफने म्हटले आहे. 

सायबर हल्ल्यामुळे पोस्ट केले गेले

टीआरएफने पोस्टमध्ये लिहिले आहे की, पहलगाममधील हल्ल्यानंतर लगेचच आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून एक खोटा संदेश पोस्ट करण्यात आला. चौकशीनंतर असे आढळून आले की, ते सायबर हल्ल्यामुळे पोस्ट केले गेले होते. उल्लंघन निश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत. एवढेच नाही तर दहशतवादी संघटनेने या सायबर हल्ल्यासाठी भारतीय सुरक्षा संस्थांनाही जबाबदार धरले आहे.

कोणत्याही पुराव्याशिवाय आम्हाला जबाबदार धरले  

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाह कसुरीचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. भारताच्या माध्यमांनी आणि सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय आम्हाला आणि पाकिस्तानला जबाबदार धरले. हे एक षडयंत्र आहे. एवढेच नाही तर  कसुरीने भारताला युद्ध शत्रू म्हटले आहे. भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो. भारताने काश्मीरमध्ये 10 लाख सैन्य पाठवून युद्धाचे वातावरण निर्माण केले आहे. पहलगाममध्ये भारतानेच हल्ला केला आहे आणि तो त्यासाठी जबाबदार आहे. हे त्याचे षड्यंत्र आहे.

दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू 

पहलगाम दहशतवादी हल्ला मंगळवारी (दि. 22 एप्रिल) झाला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात 2 परदेशी नागरिकांचा समावेश होता. या घटनेनंतर भारत सरकारने कठोर पावले उचलले आहे. सरकारने आरोपी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ताबडतोब सुरक्षा बैठक घेतली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. तसेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावरच सोडून ते भारतात परतले होते. विमानतळावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि एनएसए प्रमुख अजित डोभाल यांच्याशी चर्चा देखील केली होती. 

आणखी वाचा 

Pahalgam Terror Attack: वाघा बॉर्डर बंद करुनही दिल्लीतील पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा अट्टहास; भारताकडे मागितली एक परवानगी