Owaisi on Pahalgam Attack श्रीनगर : एमआयएचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काश्मीरमध्ये दाखल होत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा भ्याड हल्ला होता. याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. केंद्र सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर द्यावं, असं ओवेसी म्हणाले.
ओवेसी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आम्ही पाहिलं आहे की पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी इथं 26 लोकांना मारलं आहे. सर्वाधिक वेदनादायी ही बाब म्हणजे महिला आणि मुलांना वेगळं करुन पुरुषांना धर्म विचारणं, आणि ते कलमा नाही म्हणू शकले तर गोळ्या मारणं हे घृणास्पद आहे. ही घटना वेदनादायी होती. यामुळं सर्वाधिक नुकसान काश्मीरच्या लोकांचं होत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू
असदुद्दीन ओेसी यांनी म्हटलं की भारत सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आम्ही सर्वपक्षीय बैठकीत ही गोष्ट सांगितली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, हा हल्ला 22 एप्रिलला झालाहोता. पहलगामच्या बैसरण भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता.
सिंधू जल करार स्थगित
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं सुरक्षे संदर्भातील कॅबिनेट कमिटीची बैठक बोलावली होती. त्यामध्ये सिंधू जलकरार तात्काळ स्थगित करण्यात आला होता. याशिवाय भारतानं पाकिस्तानचे सर्व व्हिसा रद्द केले होते. इस्लामाबाद मधील भारताच्या उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी करण्यात आली होती. भारतानं पाकिस्तानच्या वस्तूंच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर्सची सोशल मीडिया अकाऊंट बॅन
भारत सरकारनं पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंची सोशल मीडिया अकाऊंट बॅन केली आहेत. शोएब अख्तर, शाहीद आफ्रिदी यांची यूट्यूब चॅनेल बॅन करण्यात आली आहेत. तर, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांची यूट्यूब चॅनेल देखील बॅन करण्यात आली आहेत. काही खेळाडूंची कलाकारांची इन्स्टाग्राम खाती बॅन करण्यात आली आहे. पाकिस्तानी विमानांसाठी भारताची एअर स्पेस देखील बंद करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉकड्रिल , मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्ये मॉक ड्रिल, सुरक्षेच्या दृष्टीने शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी
मुंबईनंतर ठाणे हे श्रेणी -2 मध्ये असून ठाण्यातील रेल्वे स्टेशन,बाजारपेठ वरदळीच्या ठिकाणी नागरिकांना या सरावाच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता मुंबईत एक मॉक ड्रिल आयोजित केली जाईल. या वेळी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले 60 सायरन वाजवले जातील.