नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारतानं कठोर पावलं उचलत सिंधू जलकरार स्थगित केला आहे. भारतानं पाकिस्तान सोबत जवळपास प्रकारचे संबंध संपुष्टात आणले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व प्रकारचा व्यापार देखील थांबवण्यात आला आहे. भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी केलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील विविध देश भारताच्या बाजूनं उभे राहिले आहेत. अमेरिका, जपाननंतर ऑस्ट्रेलियादेखील भारताला सहकार्य करणार असल्यानं क्वाडचे हे सर्व सदस्य भारताच्या बाजूला आहेत. त्यामुळं चीन आगामी काळात पाकिस्तानला मदत करताना 100 वेळा विचार करेल. 

नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यात फोनवर चर्चा झाली. मोदी यांनी अँथनी अल्बनीज यांचं अभिनंदन केलं. दोन्ही नेत्यांनी आपआपसातील सहकार्य अन् रणनीती भागीदारी याद्वारे पुढं जाण्यासाठी एकत्रित काम करण्यावर सहमती दाखवली.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान बरोबर तणाव वाढलेला असताना अल्बनीज यांच्यासोबतच्या चर्चेला महत्त्व आहे. 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी या चर्चेत प्रत्येक पावलावर भारताला साथ देण्यास तयार असल्याचं म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की मित्र अँथनी अल्बनीज यांना त्यांच्या पक्षाला ऐतिहासिक विजयासंदर्भात शुभेच्छा. मोदी पुढं म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यापक भागीदारीसह पुढं जाण्यास आणि सहकार्याची नवी क्षेत्र शोधण्यास एकत्र येऊन काम करण्यास सहमत आहोत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्या राजकीय पक्षानं पुन्हा सत्ता मिळवली आहे. तर, गेल्या 21 वर्षात सलग दुसरा कार्यकाळ मिळवणारे ते पहिले पंतप्रधान बनले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यापक कूटनीती भागीदारी वाढवणे आणि हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी सहकार्यानं पुढं जाऊ, त्याच्यावर मिळून काम करु, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान हे क्वाडचे सदस्य देश आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत काम केलं होतं.अमेरिका देखील भारतासोबत ठामपणे उभी आहे. त्यामुळं क्वाडमधील सर्व देश भारताच्या बाजूनं आहेत. त्यामुळं चीन देखील पाकिस्तानला मदत करण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल.