नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, तर काँग्रेसच्या के. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपद काबीज केलं. कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला मोदीविरोधक एकवटलेले पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने जवळीक पाहायला मिळाली ती काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यामध्ये.

लोकसभा निवडणुकीतील मोदीविरोधी एकजूटीचा ट्रेलरच जणू या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळाला. त्यातच, संसदेमध्ये एकमेकांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या दोन पक्षांच्या या प्रमुख नेत्यांची शपथविधी मंचावरची जवळीक बरंच काही सांगून जाणारी होती.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, राजदचे तेजस्वी यादव, बसप अध्यक्षा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, माकप नेते सीताराम येचुरी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.



सोहळा पार पडल्यानंतर सर्व विरोधकांनी हात हात घेत जनतेला अभिवादन केलं. त्यामुळे 2019 ला भाजप विरुद्ध सर्व विरोधक असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्षांच्या लोकसभेत एकूण 133 जागा आहेत. एकत्र येऊन एकमेकांविरोधात न लढल्यास या जागा वाढू शकतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांनी मोट बांधल्यास मोदी सरकारची डोकेदुखी वाढू शकते.

पक्ष - प्रमुख नेते - लोकसभेतील जागा

काँग्रेस - राहुल, सोनिया गांधी - 48

तृणमूल काँग्रेस - ममता बॅनर्जी - 34

तेलुगू देसम पक्ष - चंद्रबाबू नायडू - 16

माकपा - सीताराम येचुरी, पिनाराई विजयन - 09

समाजवादी पक्ष - अखिलेश यादव - 07


राष्ट्रवादी - शरद पवार - 06


राजद - तेजस्वी यादव - 04


आप - अरविंद केजरीवाल - 04


झारखंड मुक्ती मोर्चा - हेमंत सोरेन - 02


भाकपा - डी राजा - 01