नोएडा : 'ओप्पो' या चिनी मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप होत आहे. चिनी अधिकाऱ्यांनी तिरंग्याचा अवमान केल्याचं सांगत नोएडातील दोन हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे.


नोएडाच्या सेक्टर 63 मध्ये ओप्पो कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तिथे सुहाहू नामक ओप्पोच्या वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांनी भारतीय तिरंग्याची प्रिंटआऊट फाडून डस्टबिनमध्ये टाकली, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावर काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे.

या कृत्याचा निषेध करण्यासाठी दोन हजार कर्मचारी 9 तास आंदोलन करत होते. भारतीय झेंड्याचं भव्य पोस्टर कंपनीच्या मुख्य इमारतीवर लावून आंदोलकांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. या घोषणांमध्ये 'मोदी' आणि 'योगी' यांचा नाराही दुमदुमला. पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र एफआयआर नोंदवल्यानंतरच आंदोलक शांत झाले.

कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात भारतीय तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत असल्याचं ओप्पो इंडियाच्या वतीने एका अधिकृत परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं. या दुर्दैवी घटनेबद्दल आम्हाला खेद वाटतो. आम्ही संबंधितांवर योग्य ती कारवाई करु. ओप्पोला एक ब्रँड म्हणून भारताविषयी प्रचंड आदर आहे. आमचे 99 टक्के कर्मचारीही भारतीय आहेत.' असं कंपनीने सांगितलं आहे.