तिरुअनंतपुरम : मासिक पाळी दरम्यान महिला अशुद्ध असतात, त्यामुळे त्यांनी या काळात मंदिरात प्रवेश करु नये, असे अकलेचे तारे काँग्रेस नेते एम एम हसन यांनी तोडले आहेत. हसन हे केरळ काँग्रेसचे अंतरिम प्रदेशाध्यक्ष आहेत.
'प्रसारमाध्यमं आणि राजकारण' या विषयावरील एका सेमिनारमध्ये बोलताना एम एम हसन यांनी हे वक्तव्य केलं. 'मासिक पाळी सुरु असताना स्त्रिया अशुद्ध असतात, त्यामुळे या काळात त्यांनी मंदिरात प्रवेश करु नये.' असं ते म्हणाले. त्यानंतर महिला संघटनांनी हसन यांच्या वक्तव्याचा विरोध केला.
हसन यांच्या वक्तव्यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. हे आपलं वैयक्तिक मत नसून सामाजिक धारणा असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
केरळ काँग्रेसचे अध्यक्ष व्ही एम सुधीरन यांच्या राजीनाम्यानंतर हसन यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
'मुस्लिम आणि हिंदू महिला मासिक पाळीदरम्यान आपणहून स्वतःला धार्मिक जागांपासून दूर ठेवत. ही सामाजिक स्थिती अद्यापही पाहायला मिळते. हीच गोष्ट एका प्रश्नाला उत्तर देताना मी समजावून सांगितली.' असा दावा हसन यांनी केला आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.