Rajasthan CID Intelligence Police : भारतात राहून पाक एजन्सींना गुप्तचर माहिती देणाऱ्या तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल सत्तार (रा. हनुमानगड), नितीन यादव (रा. सुरतगड)  आणि राम सिंग (रा. बारमेर)  अशी अटक केलेल्या तिन्ही संशयितांची नावे आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ऑपरेशन सरहद अंतर्गत राजस्थान सीआयडी इंटेलिजेंस पोलिसांनी ही कारवाई केली.  अटक केलेले तिघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला महत्त्वाची माहिती देत असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे या तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  


अटक करण्यात आलेल्यांपैकी अब्दुल सत्तार हा 2010 पासून नियमितपणे पाकिस्तानमध्ये प्रवास करत होता. त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा स्थानिक एजंट म्हणूनही काम केल्याचा आरोप आहे.  
 


राजस्थानचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सरहद नावाची ही विशेष मोहीम 25 जून ते 28 जून 2022 दरम्यान राजस्थान, श्री गंगानगर, हनुमानगढ आणि चुरूच्या सीमावर्ती भागात राबविण्यात आली. या कारवाईअंतर्गत राज्याच्या विशेष शाखेच्या जयपूरच्या विशेष पथकाने 23 संशयित व्यक्तींची संयुक्त चौकशी केली. या चौकशीदरम्यान तीन जण पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात असल्याचे आढळून आले.  


अटक करण्यात आलेले तिघे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती पुरवत होते.  या कामाच्या बदल्यात पाकिस्तानी हस्तकांकडून त्यांना पैसे मिळत असत, असे प्राथमिक तपासादरम्यान   समोर आले आहे. 


प्राथमिक चौकशीत अब्दुल सत्तार याने सांगितले की, तो 2010 पासून नियमितपणे पाकिस्तानात जात आहे. अब्दुल सत्तार हा आयएसआयचा स्थानिक एजंट म्हणूनही काम करत होता. प्राथमिक चौकशीदरम्यान असे समजले की, त्याच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान आयएसआयने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला महत्त्वाची महत्त्वाची माहिती देण्यास राजी केले. भारतात आल्यानंतर तो त्याच्या पाकिस्तानी हँडलरच्या सतत संपर्कात होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेला दुसरा व्यक्ती नितीन यादव हा सुरतगड येथील रहिवासी असून तो कॅन्टोन्मेंट परिसरात फळे, भाजीपाला इत्यादी पुरवण्याचे काम करतो. त्याच्या कामामुळे तो प्रतिबंधित भागात सतत फिरत असत. चौकशीदरम्यान नितीन यादवने पाकिस्तानी महिला एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून महत्त्वाची माहिती शेअर केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या बदल्यात आयएसआयकडून त्याला पैसेही पुरवले जात असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे.


पकडलेला तिसरा व्यक्ती रामसिंग एका कारखान्यात काम करतो. चौकशीदरम्यान, असे समजले आहे की, रामगिंग हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबत आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या सीमा चौकी आणि सीमावर्ती भागाच्या महत्त्वाचे व्हिडीओ, छायाचित्रे आणि माहिती शेअर करत होता. या तिघांच्या फोनवरूनही अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे.