नागपूर : सडकी सुपारी आयात केल्याप्रकरणी आरोपी वसीम बावलाला न्यायालयाकडून 30 जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने नागपुरात म्यानमारसह ईशान्य आशियातील इतर देशातून सीमाशुल्क आणि इतर कर चुकवून सडकी सुपारी आयात केली होती. अटक केल्यानंतर वसीम बावलाला मुंबईतील पीएमएलए न्यायालयात उपस्थित करण्यात आले.  न्यायालयाने वसीम बावलाला 30 जून पर्यंत इडी कोठडी सुनावली आहे 


नागपुरात अनेक व्यापारी करचूकवेगिरी करून म्यानमारमार्गे सडकी सुपारी आयात करतात आणि शासनाचा कर बुडवतात या तक्रारीची आधी अँटी करप्शन ब्युरो आणि त्यानंतर सीबीआयने चौकशी केली होती.  त्याच प्रकरणाच्या पुढील तपासात ईडीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नागपुरात छापेमारी केली होती.  तेव्हा या संपूर्ण घोटाळ्यात वसीम बावला आणि त्याचे काही सहकारी असल्याचे ईडीला निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच वसीम बावला ईडीच्या रडार वर होता. अनेक वेळा चौकशीसाठी बोलावूनही तो चौकशीत सहकार्य करत नव्हता. अखेरीस 22 जून रोजी ईडीने त्याला अटक केल्याची माहिती आहे. 


राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून सडक्या सुपारीची तस्करी वाढली आहे. बंदी असतानाही शहरात चौका-चौकात खर्रा मिळतो. याकडे एफडीए (FDA) विभाग 'विशेष' उद्देशपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. आधीच आरोग्यासाठी घातक असलेला खर्रा हा सडक्या सुपारीमुळे आणखी जीवघेणा ठरतो. तोंडासंबंधीचे अनेक आजार यामुळेच होतात असे समोर आले आहे. नागरिकांमध्ये ही याचे व्यसन वाढत आहे. 


'पाम नट' भेसळीला सुरुवात


विभागाच्यावतीने कारवाई होत नसल्याने सुपारी व्यावसायिकांकडून गैरप्रकार वाढले आहेत. त्यांच्याकडून आता सुपारीऐवजी पाम नट भेसळ करण्यात येत आहे. हे अत्यंत विषारी समजले जाते. यानंतरही काही व्यापारी पाम नट बोलावून त्याची सुपारीत भेसळ करीत असल्याची माहिती आहे. एफडीएने जिल्ह्याबाहेर पाम नट प्रकरणी काही व्यापाऱ्यांना अटकही केली आहे, परंतु नागपुरात आतापर्यंत अशाप्रकारची ठोस कारवाई झालेली नाही. एफडीए कायद्यातही पाम नटवर बंदी आहे. 15-20 दिवसांपूर्वी वर्धमाननगरात एक ट्रक पाम नट पकडण्यात आले होते, परंतु प्रकरण दाबले असल्याची चर्चा सुरू होती. पोलीस आणि एफडीएच्या (Food and Drug Administration) भरारी पथकाला पाम नटची माहितीच मिळू शकली नाही आणि प्रकरण थंडबस्त्यात गेले असल्याचे म्हटले जाते.


हे ही वाचा :


BMC Covid Scam: मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याशी संबंधित 22 कोटी गेले कुठे? ईडीकडून तपास सुरू