मुंबई : 9 नोव्हेंबर ही तारीख उत्तराखंडचा स्थापना दिवस म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. वेगळ्या उत्तराखंडच्या मागणीसाठी अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंडचा भारताच्या प्रजासत्ताकात 27 वे राज्य म्हणून समावेश करण्यात आला. 2000 ते 2006 पर्यंत याला उत्तरांचल म्हणून संबोधले जात होते. परंतु जानेवारी 2007 मध्ये स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करून त्याचे अधिकृत नाव बदलून उत्तराखंड करण्यात आले. उत्तराखंड हा एकेकाळी उत्तर प्रदेशचा एक भाग होता. त्याची सीमा उत्तरेला तिबेट आणि पूर्वेला नेपाळशी आहे. पश्चिमेला हिमाचल प्रदेश आणि दक्षिणेला उत्तर प्रदेश ही त्याच्या सीमेला लागून असलेली राज्ये आहेत. उत्तराखंडला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते. कारण अनेक प्राचीन धार्मिक स्थळांसह, हे राज्य हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणार्या गंगा आणि यमुना या देशातील सर्वात मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे.
1877 : सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि तत्त्वज्ञ मुहम्मद इक्बाल यांचा जन्म
सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि तत्त्वज्ञ मुहम्मद इक्बाल यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1877 रोजी सियालकोट येथे झाला. सियालकोट हा आता पाकिस्तानचा भाग आहे. मुहम्मद इक्बाल मसूदी हे अविभाजित भारताचे प्रसिद्ध कवी, नेते आणि तत्त्वज्ञ होते. उर्दू आणि पर्शियन भाषेतील त्यांची कविता आधुनिक काळातील सर्वोत्तम कवितांमध्ये गणली जाते. पर्शियन भाषेत लिहिलेली त्यांची कविता इराण आणि अफगाणिस्तानमध्ये खूप प्रसिद्ध आहे, जिथे त्यांना इक्बाल-ए-लाहोर म्हटले जाते. इस्लामच्या धार्मिक आणि राजकीय तत्त्वज्ञानावर त्यांनी खूप लेखन केले आहे.
1922 : अल्बर्ट आइनस्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर
अल्बर्ट आइनस्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 1921 मध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, काही कारणास्तव नोबेल समितीने 1921 मधील पुरस्कर्त्यांची 1922 मध्ये निवड करण्यात आली.
1943 : युनायटेड नेशन्स रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन अॅडमिनिस्ट्रेशनची स्थापना
9 नोव्हेंबर 1943 रोजी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन अॅडमिनिस्ट्रेशनची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला 44 देशांनी यासाठी सहमती दर्शविली. युनायटेड नेशन्स रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन अॅडमिनिस्ट्रेशन (UNRRA) ही एक आंतरराष्ट्रीय मदत एजन्सी होती, ज्यावर मुख्यत्वे युनायटेड स्टेट्सचे वर्चस्व होते. युद्धात बळी पडलेल्यांच्या मदतीसाठी उपाय योजना, समन्वय, प्रशासन किंवा व्यवस्था करणे हा या संस्थेचा उद्धेश होता.
1947 : जुनागडचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला
जुनागडच्या नवाबामुळे काही काळ जुनागड पाकिस्तानात सामील झाले होते. परंतु 9 नोव्हेंबर 1947 रोजी भारतात समाविष्ट झाले. यासाठी जुनागड येथील लोकांनी मोठा संघर्ष केला. जुनागड, माणावदर येथील लोकांनी 99.95 टक्के मतांनी आपण भारतातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, व्ही. पी. मेनन आणि ‘आरजी हुकूमत’ यांचा त्यात महत्त्वाचा वाटा होता. जुनागडचा हा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे.
1960 : भारताचे पहिले एअर चीफ मार्शल सुब्रत मुखर्जी यांचे निधन
कोलकाता मधील एका सुविख्यात कुटुंबात 5 मार्च 1911 साली सुब्रतो मुखर्जी ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे वडील म्हणजेच त्यांचे आजोबा डॉ. प्रसन्न कुमार रॉय हे कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजचे पहिले भारतीय मुख्याध्यापक होते. त्यांचे आजोबा निबरन चंद्र मुखर्जी हे सामाजिक व शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या सुधारणा घडवून आणण्याचे कार्य करीत असत. ते ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. त्यांच्या आजी सरला रॉय ह्यांनी गोखले मेमोरियल स्कूलची स्थापना केली होती. त्यांचे वडील सतीश चंद्र मुखर्जी हे इंडियन सिव्हील सर्विस मध्ये 1891 सालापासून कार्यरत होते. 8 ऑक्टोबर 1932 रोजी सहा कॅडेट्सना युकेच्या रॉयल एयर फोर्स मध्ये सुब्रत मुखर्जी यांना प्रवेश मिळाला आणि योगायोगाने त्याच दिवशी भारतीय विधानसभेत इंडियन एयरफोर्स ऍक्ट पास झाला आणि भारतीय वायुसेनेचा जन्म झाला. सुब्रतो ह्यांची पायलट म्हणून निवड झाली. सुब्रतो मुखर्जी हे एयर इंडियाच्या पहिल्या फ्लाईटचे प्रवासी होते. हे विमान नोव्हेंबर 1960 साली टोकियोला गेले होते. 8 नोव्हेंबर 1960 रोजी सुब्रतो मुखर्जी त्यांच्या एका मित्राबरोबर टोकियो मध्ये जेवत असताना त्यांच्या श्वासनलिकेत अन्नाचा तुकडा अडकला आणि श्वास न घेता आल्याने जीव गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
1989 : पश्चिम आणि पूर्व बर्लिनला वेगळे करणारी बर्लिनची भिंत पाडण्यात आली
तीन दशकांपासून पश्चिम आणि पूर्व बर्लिनला वेगळे करणारी बर्लिनची भिंत 9 नोव्हेंबर 1989 रोजी पाडण्यात आली. 1961 मध्ये बांधलेली या भींतीची लावी तब्बल 45 किलोमीटर होती.
1989 : ब्रिटनमध्ये मृत्यूदंडावर बंदी घालण्यात आली
आजच्या दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर 1989 रोजी ब्रिटनमध्ये मृत्यूदंडावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
1996 : इव्हेंडर होलीफिल्डने तिसऱ्यांदा जागतिक हेवीवेट बॉक्सिंगचे विजेतेपद पटकावले
इव्हेंडर होलीफिल्डने आजच्या दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर 1996 रोजी माइक टायसनचा तांत्रिक आधारावर पराभव करून तिसऱ्यांदा जागतिक हेवीवेट बॉक्सिंगचे विजेतेपद पटकावले
2000 : उत्तराखंड राज्याची स्थापना
अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंडचा भारताच्या प्रजासत्ताकात 27 वे राज्य म्हणून समावेश करण्यात आला. 2000 ते 2006 पर्यंत याला उत्तरांचल म्हणून संबोधले जात होते. परंतु जानेवारी 2007 मध्ये स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करून त्याचे अधिकृत नाव बदलून उत्तराखंड करण्यात आले. उत्तराखंड हा एकेकाळी उत्तर प्रदेशचा एक भाग होता. त्याची सीमा उत्तरेला तिबेट आणि पूर्वेला नेपाळशी आहे. पश्चिमेला हिमाचल प्रदेश आणि दक्षिणेला उत्तर प्रदेश ही त्याच्या सीमेला लागून असलेली राज्ये आहेत. उत्तराखंडला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते. कारण अनेक प्राचीन धार्मिक स्थळांसह, हे राज्य हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणार्या गंगा आणि यमुना या देशातील सर्वात मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे.