On This Day In History : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी भारतीय क्रांतिकारी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 रोजी अविभाजित भारतातील (आता बांगलादेशात) हबीबगंज जिल्ह्यातील पोइल नावाच्या गावात झाला. बिपिनचंद्र पाल हे भारतीय क्रांतिकारक, शिक्षक, पत्रकार आणि लेखक होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महान व्यक्तींपैकी पाल हे एक आहेत. ते प्रसिद्ध लाल-बाल-पाल त्रिकूट (लाला लजपत राय, बालगंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल) यांचा भाग होते. तसेच आजच्या दिवसाची भारतातील एका महान शास्त्रज्ञाचा जन्मदिवस म्हणून नोंद आहे. विज्ञानातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर1888 रोजी तिरुचिरापल्ली, तमिळनाडू येथे झाला. प्रकाशाच्या परावर्तनाच्या क्षेत्रातील शोधांसाठी रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. 


1862 : मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट बहादूर शाह जफर यांची पुण्यतिथी


बहादूर शाह जफर (1775–1868) हे भारतातील मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट आणि सुप्रसिद्ध उर्दू कवी होते. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भारतीय सैनिकांचे नेतृत्व केले. 24 ऑक्टोबरला बहादूर शाह यांची जयंती आहे. बहादूर शाह जफर यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1775 रोजी दिल्लीत झाला. बहादूर शाह हे अकबर शाह दुसरा आणि लालबाई यांचा मुलगा होता. त्यांनी बर्‍याच प्रसिद्ध उर्दू कविता लिहिल्या, ज्यापैकी बर्‍याचशा इंग्रजांविरुद्धच्या बंडाळीच्या काळात हरवल्या किंवा नष्ट झाल्या. इंग्रजांना देशातून हाकलण्याचे स्वप्न उराशी बाळगून 7 नोव्हेंबर 1862 रोजी त्यांचे निधन झाले.


1879: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.


1903: शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्मदिवस


शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1903 रोजी झाला. बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे आहेत.


1917: पहिले महायुद्ध : गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.


1954: अभिनेता कमल हासन यांचा जन्मदिन 


अभिनेता, डान्सर , दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता कमल हासन यांचा आज वाढदिवस आहे. कमल हसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. त्यांनी बाल कलाकार म्हणून कलाथूर कोनम्मा या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, ज्यासाठी त्याना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. यानंतर 1962 मध्ये त्यांनी मल्याळम इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि 1975 मध्ये त्यांनी अपूर्व रागांगल या चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. कमल हासन हे 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये अभिनय केला आहे. ज्यामध्ये हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि बंगाली भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. कमल यांचेच चित्रपट भारतातून सर्वाधिक ऑस्करमध्ये गेले आहेत. चाची 420 , अप्पू राजा आणि यासारख्या अनेक हिट चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.


1981:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा जन्मदिवस.


अभिनेत्री अनुष्का शेट्टीने उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहेत. 15 वर्षांहून अधिक काळ दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अनुष्काने 'बाहुबली','अरुंधती','बेदम' आणि 'रूद्रमा देवी' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.