मुंबई: भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये बंगाल ही जहाल क्रांतिकारकांची भूमी समजली जायची. या भूमीत अनेक बुद्धीवादी जन्मले आणि जहाल क्रांतीकारी संघटना स्थापन झाल्या. बाघा जतीन हे त्यापैकीच एक. बाघा जतीन यांनी युगांतर ही संघटना स्थापन केली आणि ब्रिटिशांविरोधात लढा दिला. 10 सप्टेंबर 1915 साली त्यांचे निधन झाले. 10 सप्टेंबर हा दिवस इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी हिग्ज बोसॉन कणाचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पामध्ये, लार्ज हायड्रॉन कोलायडरची पहिली चाचणी आजच्याच दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर 2008 रोजी घेण्यात आली होती. 


जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात नेमकं काय घडलं होतं,  



1846: शिलाई मशिनचे पेटंट


मनुष्याच्या दैनदिन कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिलाई मशिनचा शोध अॅलायस होवे याने लावला होता. आजच्याच दिवशी, 10 सप्टेंबर 1946 रोजी त्यांने शिलाई मशिनचे पेटंट मिळवले. 


1915- जतिंद्रनाख मुखर्जी उर्फ बाघा जतिन यांचे निधन


ब्रिटिश सत्तेविरोधात लढणाऱ्या जहाल स्वातंत्र्यसैनिक बाघा जतिन यांचे आजच्या दिवशी निधन झालं. लहानपणी त्यांनी एका वाघाला मारलं होतं, त्यामुळे त्यांचे नाव नंतर बाघा जतीन असं पडलं. बंगालमध्ये जहाल क्रांतिकारकांच्या यादीत त्यांचे नाव वरती घेतलं जातं. युगांतर पार्टीची त्यानी स्थापना केली आणि नंतरच्या काळात या संघटनेने ब्रिटिशांविरोधात सशस्त्र क्रांती पुकारली.  


1965- शहीद अब्दुल हमिद यांना मरणोत्तर परमवीर चक्र


पाकिस्तानसोबत झालेल्या 1965 सालच्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या अब्दुल हमिद यांना मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवण्यात आलं. अब्दुल हमिद हे 4 ग्रेनेडियरमधील जवान होते. त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान खेमकरण सेक्टरच्या आसल उत्ताडमध्ये पराक्रम गाजवला होता. या युद्धात ते शहीद झाले. 


1966- पंजाब आणि हरयाणा राज्यांना मान्यता


भाषिक आधारावर राज्याची निर्मिती करण्याचं धोरण जाहीर झाल्यानंतर देशात अनेक राज्ये उदयास आली. नंतरच्या काळात हिंदी भाषिक हरयाणा आण पंजाबी भाषिक पंजाबची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली. हीच मागणी लक्षात घेता 10 सप्टेंबर 1966 रोजी संसदेने पंजाब आणि हरयाणा या दोन नव्या राज्यांना मान्यता दिली. 


2008- लार्ज हायड्रॉन कोलायडर (LHC) ची पहिली चाचणी पूर्ण


लार्ज हायड्रॉन कोलायडर हा जगातील सर्वात मोठा पार्टिकल कोलायडर प्रकल्प आहे. अणू कणांचा अभ्यास करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. लार्ज हायड्रॉन कोलायडरची निर्मिती युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्चने केली आहे. यामध्ये जगभरातील 100 देशांतील 10 हजाराहून शास्त्रज्ञांनी भाग घेतला आहे. 


लार्ज हायड्रॉन कोलायडर हा एक 27 किमीचा मोठा ट्रक लूप असून फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर हा प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. लार्ज हायड्रॉन कोलायडरच्या आधी सर्न च्या शास्त्रज्ञांनी हिग्ज बोसॉन किंवा देव कणाचा शोध घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.