श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या नगरोटा येथे सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केल्याच्या घटनेचं गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव आणि उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सुरक्षा दलाचे कौतुक केले. जवानांच्या दक्षतेमुळे दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात यश आल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, की "आमच्या सैनिकांनी पुन्हा शौर्य आणि दक्ष असल्याचे दाखवून दिलं आहे. त्यांच्या दक्षतेमुळेचं जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कारस्थान उधळून लावण्यात यश आलं. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या घटनेवरुन दहशतवाद्यांचा मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे समोर आलं आहे.
गुरुवारी नगरोटामध्ये काय घडलं?
जम्मू जिल्ह्यातील नगरोटा भागात चकमकी दरम्यान गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाने ट्रकमध्ये जाणारे 4 अतिरेकी ठार मारले. जैश-ए-मोहम्मदच्या या चार दहशतवाद्यांच्या गटाने बुधवारी रात्री सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतात घुसखोरी केली. ते जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमध्ये जात होते, पोलिसांनी नगरोटाजवळील टोल प्लाझाजवळचं त्यांना रोखलं. त्यांना रोखल्यानंतर सशस्त्र अतिरेक्यांनी पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला. चकमकीदरम्यान ट्रकला आग लागली. परिसराचा बंदोबस्त करण्यात आला. जादा फौजफाटा मागवून चकमकीत चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
LOC ओलांडून कोणताही गोळीबार झालेला नाही; त्या हल्ल्याचे भारतीय लष्कराकडून खंडन
जम्मू-काश्मीरचे पोलीस आयजी मुकेश सिंह यांनी सांगितले होते, की नगरोटामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून दारूगोळा व्यतिरिक्त 11 एके-47 रायफल, 6 एके-56 रायफल, 3 पिस्तूल, 29 ग्रेनेड, मोबाईल फोन, बंपर, पिव्हॉट बॅग, मोबाइल सेल, मासिक जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आहे.