चेन्नई : देशातल्या आठ राज्यातील 20 हजार पेट्रोल पंप 14 मेपासून दर रविवारी बंद राहणार आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.


या आठ राज्यांमध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र आणि हारियाणा आदी राज्यांचा समावेश आहे. पेट्रोल पंप डिलर्सच्या एका संघटनेनं याबाबत माहिती दिली.

या संघटनेचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य सुरेश कुमार यांनी सांगितलं की, ''काही वर्षांपूर्वीच आम्ही याबाबतचा निर्णय घेतला होता. पण तेल कंपन्यांनी आमच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अद्याप या निर्णयावर आंमलबजावणी झाली नव्हती. पण 14 मेपासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.''

पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या 'मन कि बात'मधील तेल बचतीच्या आहवानाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांना 150 कोटींचा फटकाही बसू शकतो, असा अंदाजही कुमार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या निर्णयाला तेल उत्पादक कंपन्यांनी समर्थन दिलं नाही. पण त्यांच्याशी या मुद्द्यावरुन चर्चा सुरु असल्याचंही कुमार यांनी सांगितलं.