नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर अचानक चलनातून बाद झालेल्या नोटांचं रिझर्व्ह बॅंक करणार तरी काय याचं कुतूहल सगळ्यांनाच आहे. या प्रश्नावर काही प्रमाणात का होईना पण रिझर्व्ह बॅंकेच्या केरळ कार्यालयाने एक वेगळं उत्तर शोधलं आहे.


स्टेशनरी विकत घेण्यासाठी पैसे देणं आपल्याला माहिती आहे पण आपल्या स्टेशनरीतच नोटा असतील अशी सोय रिझर्व्ह बँकेने केली आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा कन्नुर जिल्ह्यातल्या एका प्लायवूड कंपनीला पुनर्वापरासाठी देण्याचा प्रयोग रिझर्व्ह बॅंकेच्या
केरळ कार्यालयाने केला आहे.

अद्ययावत टेक्नॉलॉजी असलेल्या 'द वेस्टर्न प्लायवुड्स लिमिटेड' या कंपनीला 250 रुपये टन या दराने जुन्या नोटा दिल्या जात आहेत. फॅक्टरीमध्ये या नोटांचे अगदी बारीक तुकडे केले जातात. या तुकड्यांना लाकडाच्या तुकड्यांमध्ये मिसळून त्याचा लगदा तयार केला जात आहे. त्यानंतर लाकडाचा 93 टक्के लगदा आणि नोटांचा 7 टक्के लगदा एकत्र करुन त्यापासून हार्डबोर्ड, सॉफ्टबोर्ड आणि इतर स्टेशनरी तयार केली जात आहे.

डिसेंबरच्या शेवटी ज्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा जमतील त्या एकावर एक ठेवल्या तर माऊंट एव्हरेस्टपेक्षा तिप्पट उंचीचा पर्वत तयार होईल असं बोललं जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असेल्या नोटा जाळणं किंवा पुरणं पर्यावरणाला हानीकारक असल्याने रिझर्व्ह बॅंकेच्या केरळ कार्यालयाने पुनर्वापराचा हा पर्याय शोधला आहे.