कटक: देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. आता त्या यादीमध्ये ओडिशाची भर पडली असून राज्यात 5 मे ते 15 मे या दरम्यान लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.
ओडिशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, गेल्या 24 तासात ओडिशामध्ये 8,015 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 5,634 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन ती आता 4.62 लाखांवर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 3.91 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर आतापर्यंत 2,068 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 69,453 झाली आहे.
ओडिशामध्ये मोफत लसीकरण
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या वतीने या कार्यक्रमावर दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
गेल्या 24 तासात भारतात कोरोनाच्या 3.92 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर मृतांचा आकडा 3689 इतका झाला आहे. शुक्रवारी देशात चार लाख रुग्ण संख्या वाढली होती. देशातील कोरोनाची रोजची ही वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे 3500 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या जगाच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून शनिवारी राज्यात तब्बल 63 हजार 282 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे शनिवारी 61 हजार 326 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 39,30,302 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases India Today: देशात कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासात 3.92 लाख नवीन रुग्णांची भर, 3689 रुग्णांचा मृत्यू
- Election Results 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सत्ता कोणाची? भाजपची प्रशंसा करत संजय राऊत यांचं भाकित
- Election Results 2021: बंगालमध्ये सुरुवातीचे कल हाती, तृणमूल सत्ता राखण्याची चिन्हे 191 जागांवर आघाडीवर