Election Results 2021 देशभरात कोरोनाचं संकट फोफावत असतानाही या दरम्यान पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काही क्षणांनी हाती येणार आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी इथं पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात साऱ्या देशात उत्सुकता पाहायला मिळत आहे. अर्थात हे प्रमाण कमी असलं तरीही सत्ता कोण राखणार आणि सत्तापालट कुठे होणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा स्थिरावल्या आहेत. हेच चित्र पाहता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तृणमूलच्याच हाती पश्चिम बंगालची सत्ता असल्याचं म्हणत ममता बॅनर्जी यांच्या नावाला पसंती दिली. तर, सत्तांतराबाबतही त्यांनी भाकित केलं. 


रविवारी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार असल्याचं भाकित वर्तवत इतर राज्यांमध्ये मात्र असं कोणतंही चित्र दिसून येणार नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. 


पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता असेल हे सर्वांनाच ठाऊक आहे, तर केरळमध्येही सत्तापरिवर्तनाही कोणतीही चित्र नाहीत, असं ते म्हणाले. सोबतच दुपारपर्यंत निवडणूक निकाल अधिक स्पष्ट होतील, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचं आव्हान स्वीकारत नंदीग्राममधून निवडणूक लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांची प्रशंसा केली. शिवाय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणं अशक्य असून त्यांचाच विजय अटळ आहे यावर त्यांनी जोर दिला. 


भाजपच्या मेहनतीची प्रशंसा 


निवडणुकांच्या या रणसंग्रामात कोरोनाच्या संकटालाही न जुमानता भाजपनं केलेल्या सर्व प्रयत्नांची संजय राऊत यांनी प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर राज्यांतील बडे नेते पश्चिम बंगालमध्ये पोहोतले, तिथं त्यांनी पक्ष बळकटीला प्राधान्य दिलं. परिणामी त्यांच्या पक्षबांधणी, नियोजनामुळं या साऱ्याचा धक्का तृणमूलच्या बहुमताला बसेल ही बाबही त्यांनी नाकारली नाही. बहुमताच्या आकड्यात बदल होण्यास आणखी एक घटक कारणीभूत असेल हेसुद्धा त्यांनी स्पष्ट करत कोरोना परिस्थितीकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं. 


Assembly election results 2021 counting : मतमोजणीला लागणार अपेक्षेपेक्षा जास्त वेळ ; जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण 


कोरोनाने सर्वजण बेजार; का झाली ही दशा? 


देशात सर्वत्र कोरोनाचा कहर वाढत आहे. याच धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या निवडणुकांमुळं कोरोना फोफावला, यावर मद्रास उच्च न्यायालय आणि देशातील सर्वोच्च न्यायालयानंही निवडणूक आयोगाला कारणीभूत ठरवल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. या निवडणुकांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे, कोरोनाने सर्वजण बेजार झाले आहेत  ही परिस्थिती का ओढावली याचं चिंतन करण्याची वेळ आहे पण, त्यासाठीही ऑक्सिजन लागतोच असं म्हणत त्यांनी सद्यस्थितीवर कटाक्ष टाकला.