Chief Justice NV Ramana : देशातील प्रमुख तपास यंत्रणा असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या निःपक्षपातीपणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सीबीआयच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्यामुळं सामाजिक वैधता आणि सार्वजनिक विश्वास पुन्हा मिळवणे ही काळाची गरज आहे. राजकीय अधिकारी बदलतील, तुम्ही मात्र, कायम आहात असे खडे बोल रमणा यांनी सीबीआयला सुनावले आहेत.
दिल्लीतील एका कार्यक्रमात एन व्ही रमणा बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. कृती आणि निष्क्रियतेमुळं केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे ते म्हणालेत. तपास यंत्रणांना स्वतंत्र, स्वायत्त बनवणे ही काळाची गरज आहे. एकाच गुन्ह्याचा तपास अनेक एजन्सींकडून केल्यानं त्रास होतो. गुन्हा दाखल झाला की, त्याचा तपास कोणती एजन्सी करणार हे ठरवावे. आजकाल एकाच प्रकरणाची अनेक एजन्सीद्वारे चौकशी केली जाते. यामुळं संस्थेला छळवणुकीचे साधन म्हणून दोष देण्यापासून वाचवले जाईल. अहवाल आल्यानंतर कोणत्या एजन्सीने तपास हाती घ्यायचा हे संस्थेने ठरवावं, असेही सरन्यायाधीस म्हणाले. जेव्हा तुम्ही नतमस्तक होणार नाही तेव्हा तुम्ही शौर्यासाठी ओळखले जाल, असेही एन व्ही रमणा म्हणाले.
सत्ताधारी नेत्यांकडून पोलिसांचा गैरवापर करणे ही नवीन बाब नाही. पोलिसांवर सामान्यतः कायद्याचे राज्य राखण्याचे काम असते. आणि विशेष म्हणजे ते न्याय वितरण प्रणालीचा अविभाज्य भाग असतात. पोलिसांना पूर्ण स्वायत्तता द्यावी, ही आग्रहाची मागणी आहे. सर्व संस्थांनी लोकशाही मूल्यांचे पालन आणि बळकटीकरण केले पाहिजे. कोणत्याही हुकूमशाही प्रवृत्तींना वाढू देऊ नये. न्यायपालिकेच्या निःपक्षपातीपणामुळे तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याच्या विनंत्यांचा पूर आला आहे. परंतू कालांतराने इतर संस्थांप्रमाणेच सीबीआयचीही कठोर तपासणी झाली पाहिजे असेही रमणा यावेळी म्हणाले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. अनेकदा पोलिस अधिकारी आमच्याकडे येतात आणि सरकार बदलल्यानं त्रास होत असल्याची तक्रार करतात. परंतू तुम्ही हे लक्षात ठेवावं की, लोकप्रतिनिधी काळाबरोबर बदलत राहतात, पण तुम्ही कायमस्वरुपी आहात असे रमणा म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: