मुंबई : देवेंद्र फडणवीसांवर आपण फार पूर्वीपासून आरोप करत होतो, पुढे जाऊन ते राज्याचे मुख्यमंत्री होतील याची कल्पना नव्हती असा दावा ईडीनं अटक केलेल्या सतीश उके यांनी आपला बचाव करताना कोर्टापुढे केला. कोट्यावधींचा भूखंड बळकावत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरमधील वकील सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं 6 एप्रिलपर्यंत अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) च्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिलेत. सध्या या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं ताब्यात घेऊन चौकशीची तपासयंत्रणेची मागणी मान्य करत असल्याचं न्यायालयानं आपल्या आदेशांत स्पष्ट केलं आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोप करत न्यायालयात खटले दाखल केल्यानंच उके यांचं नाव चर्चेत आलं होतं. आपल्या साथीदारांच्या मदतीनं शस्त्राचा धाक दाखवत बोखारा येथील साडेपाच एकर भूखंड बळकावल्याचा गुन्हा अजनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ईडीनं उकेंविरोधात चौकशी सुरू केली होती. गुरुवारी नागपुरात तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अॅड. उके आणि त्यांच्या भावाला अटक केली. अटक केल्यानंतर शुक्रवारी त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले.
जमीन खरेदीविक्रीच्या गैरव्यवहारात मनी लँड्रिंग कायद्यानुसार हा खटला दाखल केल्याची माहीती ईडीनं उकेंची रिमांड घेताना कोर्टापुढे केला. यासोबतच अजून एका जमिनीच्या प्रकरणातही उके यांनी खोटी कागदपत्र दाखवून फसवणूक केल्याची माहितीही ईडीच्यावतीने अॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल असून गुन्हेगारीतून मिळवलेली आहे, तपासादरम्यान जमिनीसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यामुळे आरोपींची चौकशी होणे गरजेचे असून त्यासाठी कस्टडी मिळणं आवश्यक असल्याचं वेणेगावकर यांनी कोर्टाला सांगितल.
मात्र ही कारवाई करताना ईडीकडून नियमांचं पालन करण्यात आलेलं नसून निव्वळ राजकीय सुडबुद्धीनंच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोर उकेंनी केला. गुरुवारी साडे 6 वाजता ही छापेमारी सुरू झाली, अटकेनंतर 24 तासांच्या आत न्यायालयात हजार करणे गरजेचे असूनही त्या प्रक्रियेचे पालन केलं गेलं नाही. तसेच कोणत्या आधारावर अटक करण्यात आली?, हे सुद्धा सांगण्यात आलेल नाही. त्यांच्या घरात अचानक धाड टाकण्यात आली मोठ्या संख्येत सीआरपीएफ जवानांना बंदुका घेऊन आले. तपासाचं समन्स साडे 10 वाजता पाठवण्यात आलं, मात्र त्याआधीच छापेमारी सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत अधिकार हे कोणत्याही विशेष कायद्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. आपण न्यायमूर्ती लोयांसाठी लढत होतो. आपण फडणवीस, गडकरी यांच्या विरोधात खटले दाखल केले. त्यासाठी फडणवीसांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला अनेकदा धमकावलं आणि त्याला आपण दाद देत नाही म्हणूनच आपल्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा न्यायालयाच्या परवानगीनं अॅड. सतीश उके यांनी स्वतःसाठी युक्तिवाद करताना केला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha