Raj Thackeray Gudi Padwa sabha : दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळावा आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर (Mumbai Shivaji Park) पार पडणार आहे. राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी या तयारीचा आढावा घेतलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्चला मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन" असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं.  शिवाय या मेळाव्याचा एक टीझरही मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे.


राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी पुण्यात झालेल्या मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी बोलताना आजचं भाषण केवळ ट्रेलर आहे, 2 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात पूर्ण पिक्चर असेल, असं म्हटलं होतं. त्यानंतरच राज ठाकरेंच्या आज पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आज गुढीपाडवा आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळवा होणार आहे. सभेला संपूर्ण राज्यातून मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दिले होते. त्यामुळे आज प्रचंड गर्दी शिवाजी पार्कात होण्याची शक्यता आहे. यासाठी तयारी देखील जोरदार सुरु आहे.  


राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचं मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मत व्यक्त केलं आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला, अशी टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. हीच बाब लक्षात घेत 23 जानेवारीच्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास पकडली आणि राज्यातील हिंदुत्वाची पोकळी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेची जागा खाली झाल्यानंतर ती जागा घेण्याचा प्रयत्न अजूनही म्हणावा तसा मनसेकडून पाहायला मिळत नाही. याबाबत देखील आज राज ठाकरे बोलू शकतात अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.


पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करुन राज्यातील सातत्याने निर्माण होत असलेल्या वादावर भाष्य केलं. मात्र मागील काही काळात सातत्याने होत असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर चकार शब्द काढला नव्हता. त्यामुळे उद्याच्या सभेत सर्वसामान्यांचे प्रश्न, शिवसेनेचं हिंदुत्व यावर बोलतानाच भाजपसोबत युती आणि केंद्रीय यंत्रणांच्या वाढत जाणाऱ्या कारवाया यावर भाष्य करणार का हे पाहावं लागेल.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha