Covid Precaution Dose : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात (Covid Vaccination) गुरुवारी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये कोरोना लस आणि बूस्टर डोस यांमधील अंतर कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या कोरोना लस आणि बूस्टर डोसमधील अंतर नऊ महिने आहे. हे अंतर सहा महिने करण्याची शिफारस समितीच्या वतीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालय अंतिम निर्णय घेईल.


राष्ट्रीय सल्लागार समितीच्या पार पडलेल्या बैठकीत, आधी घेतलेल्या कोरोना लसीऐवजी वेगळा बूस्टर डोस घेण्यासंदर्भातील एका अभ्यासावरही चर्चा करण्यात आली. या संदर्भात वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने (CMC) केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांचाही आढावा घेतला. यावर समितीच्या सदस्यांना कोरोना लस आणि वेगळा बूस्टर डोस यांचं मिश्रण करण्याबाबत निष्कर्षामध्ये अभाव आढळला आहे. समितीनं सांगितलं आहे की, अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाहीत. CMC कॉलेजनं कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaccine) या दोन लसींच्या मिश्रणावर अभ्यास केला होता.


सध्या, 18 वर्षांवरील सर्व जण ज्यांचे कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, असे व्यक्ती बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्या-त्या देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नऊ महिन्यांच्या कालावधीपूर्वी बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिली आहे.


मंकीपॉक्सच्या धोक्यासंदर्भातही चर्चा
मंकीपॉक्स व्हायरसचा धोका आणि लसीकरणाची गरज यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदस्यांचे मते, देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकही प्रकरण समोर आलेलं नाही. मात्र मंकीपॉक्स व्हायरसवर देखरेख ठेवण्याची गरज आहे. समितीने 6-12 वयोगटातील कोवॅव्हॅक्स आणि कॉर्बेव्हॅक्स लसींवरील अभ्यासचंही पुनरावलोकन केलं. समितीच्या सदस्यांनुसार, कोरोनमुळे लहान मुलांचे प्रमाण इतकं अधिक नाही. त्यामुळे 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे लसीकरण सुरू करण्याबाबत सध्या निर्णय घेणं शक्य नसल्याचं सुत्रांकडून समोर आलं आहे. भारताच्या औषध नियामक मंडळाने यावर्षी एप्रिलमध्ये पाच ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जैविक ईची कोविड-19 लस कॉर्बेव्हॅक्स आणि सहा ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता दिली होती.