पणजी (गोवा) : राज्यात कुठेही अपघात घडल्यानंतर जखमींपर्यंत दहा मिनिटांत पोहचता यावे व त्यास प्रथमोपचार देण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आरोग्य खात्यातर्फे आज 20 दुचाकी अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन करण्यात आले. येत्या वर्षी अशा प्रकारच्या शंभर अॅम्ब्युलन्स गोव्यातील रस्त्यांवरुन धावतील एवढी व्यवस्था केली जाणार आहे.


ईएमआरआर 108 अॅम्ब्युलन्स सेवेखाली गोव्यातील रस्त्यांवरुन रुग्णवाहिका धावतात. आता 108 सेवेखालीच 20 दुचाकी अॅम्ब्युलन्सही रस्त्यावरुन धावणार आहेत. आज या सेवेला आरंभ झाला. फस्ट रिस्पॉन्स अॅम्ब्युलन्स म्हणून त्या ओळखल्या जातात.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या आधुनिक पद्धतीच्या दुचाकी अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन करण्यात आले. पर्वरी येथील सचिवालयाजवळ उद्घाटनाचा कार्यक्रम झाला.

दुचाकी अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन सिलिंडर व अन्य प्राथमिक उपकरणे आहेत. एखाद्या अपघातग्रस्ताला दहा मिनिटांत प्रथमोपचार देता यावेत अशी व्यवस्था केली गेली आहे.

केवळ 20 अॅम्ब्युलन्स पूर्ण गोव्यासाठी पुरेशा नाहीत. उसगावमधील एक कंपनीही आणखी 25 दुचाकी अॅम्ब्युलन्स पुरस्कृत करणार आहे. एकूण 100 दुचाकी येत्या वर्षी गोव्यातील रस्त्यांवरुन धावतील असे जाहीर करण्यात आले.

आरोग्य खात्याचे तसेच ईएमआरआर सेवेचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून व हिरवा बावटा दाखवून दुचाकी अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन केले गेले.

एका दुचाकी अॅम्ब्युलन्सच्या खरेदीसाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. दुचाकीस्वारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुचाकीवरून रुग्णाला आणले जाणार नाही, पण प्रथमोपचार तातडीने मिळाल्यानंतचार चाकी अॅम्ब्युलन्समध्ये घालून रुग्णाला इस्पितळात नेले जाईल.

मुख्यमंत्री पर्रिकर म्हणाले, की वाहतूक कोंडीची समस्या, अरुंद रस्ते तसेच अन्य समस्यांवर मात करत दुचाकी अॅम्ब्युलन्स अपघातग्रस्त रुग्णापर्यंत लवकर पोहचतील. मोठ्या अॅम्ब्युलन्स पोहचण्यास काहीवेळा विलंब लागतो. तोर्पयत दुचाकी घटनास्थळी पोहचतील. केवळ किनारी भागातच नव्हे तर सगळीकडेच दुचाकी अॅम्ब्युलन्सची गरज असते. जिथे जास्त अपघात होतात अशा ठिकाणी प्रथम दुचाकी अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या जातील.