Monkeypox Cases In India : राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी मंकीपॉक्स (Monkeypox)  विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशातील मंकीपॉक्स रुग्णांची एकूण संख्या दहा झाली आहे. दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सचे प्रत्येकी 5 - 5 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्ली आणि केरळने एकप्रकारे देशाची चिंता वाढवली आहे.  


राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे पाच रुग्ण झाले आहेत.  एलएनजेपीचे (LNJP) मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुरेश कुमार (Dr Suresh Kumar) म्हणाले की, 'दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळला आहे. 22 वर्षीय महिलेला मंकीपॉक्स झाल्याचं समोर आले आहे. 12 ऑगस्ट रोजी संक्रमीत महिलेचे नमुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 22 वर्षीय महिला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.' डॉ. कुमार यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, आज एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याआधी तीन रुग्ण उपचार घेत आहेत. तर एका रुग्णाला ठीक झाल्यानंतर सोडण्यात आले आहे.  


केरळमध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर राजधानी दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. सध्या देशभरात मंकीपॉक्सचे दहा रुग्ण आढळले आहेत. एका मंकीपॉक्स रुग्णाचा मृत्यूही झालाय. 


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.


काय करावं?
मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाच्या किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहू नये.
मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास मास्क आणि सर्जिकल हँड ग्लव्हजचा वापर करावा.
हात स्वच्छ ठेवावेत. साबण किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करुन हात साफ ठेवावेत.
तुम्हाला मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास आयसोलेशनमध्ये राहून आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा.


काय करु नये?
मंकीपॉक्स संक्रमित किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तीचे कपडे वापरू नये.
मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या कपड्यांसोबत तुमचे कपडे धुवू नका.
मंकीपॉक्स संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध टाळा.
मंकीपॉक्स संक्रमित किंवा मंकीपॉक्ससदृश्य लक्षणं आढळलेल्या व्यक्तीची भांडी वापरू नये.
चुकीच्या माहितीच्या आधारे कुणालाही घाबरवू नये.