नवी दिल्ली : ब्रिटीशांची परंपरा मोडत पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 चं रेल्वे बजेट सादर केलं. ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा अरुण जेटली यांनी केली.


स्वतंत्र रेल्वे बजेट बंद झालं असलं तरी त्याची स्वायत्तता कायम राहणार असल्याचं अरुण जेटली म्हणाले. रेल्वेतील स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधांवर अधिकाधिक भर दिला जाईल, प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचं अरुण जेटलींनी सांगितलं.

1 लाख 31 हजारांचं रेल्वे बजेट

सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटींची तरतूद केली आहे. विकास कार्यांसाठी रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना केली जाईल. यासाठी सरकारने 55 हजार कोटी दिले आहेत.

3500 किमी लांबीचा लोहमार्ग

2017-18 आर्थिक वर्षासाठी 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला जाण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसंच धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करण्याची सरकारची योजना असल्याची त्यांनी सांगितलं.

प्रवाशांसाठी आणखी काय सोयी?

अरुण जेटली म्हणाले की, "प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढील पाच वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या वेगळ्या फंडांची स्थापना केली जाईल. तसंच 2020 पर्यंत ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग बंद होईल. याशिवाय देशातील 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे."

दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने लावले जातील. 2019 पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमधील शौचालयांचं रुपांतर बायोटॉयलेटमध्ये करण्यात येईल, असंही जेटलींनी यावेळी जाहीर केलं.

तर ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही. याचाच अर्थ ई-तिकीटामुळे प्रवाशांचा प्रवास स्वस्त होणार आहे.

तसंच नवीन मेट्रो धोरणामुळे तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होती, असंही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमध्ये सांगितलं.

 

रेल्वे बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे

- 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला

- ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही

- 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला

- 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर

- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 1 लाख कोटींचा फंड

- ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग

- धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करणार

- दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने

- 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर

- 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट

- IRCTC, IRCON या रेल्वेशी निगडीत कंपन्या लवकरच शेअर बाजारात लिस्ट करणार

- सुरक्षा दलातल्या जवानांना त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र सिस्टीम राबवणार