मुंबई : टाटा समुहाकडे (TATA Group) एअर इंडिया (Air India) कंपनीची मालकी आल्यापासून कामकाजामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. आता फ्लाईट कर्मचाऱ्यांच्या (Flight Crew) युनिफॉर्ममध्येही मोठा बदल करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एअर इंडिया येत्या काही महिन्यांमध्ये क्रू मेंबर्सच्या गणवेशामध्ये बदल करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एअर इंडियाच्या फ्लाईट अटेंडेन्ट (Flight Attendent) साडीऐवजी वेगळ्या गणवेशामध्ये दिसतील. केबिन क्रूचा नवीन युनिफॉर्मदेखील ट्रेडिशनल असणार आहेत. 


एअर इंडियाच्या केबिन क्रूचा युनिफॉर्म बदलणार


मागील सहा दशकांपासून एअर इंडियाच्या क्रू मेंबर्स (Air India Crew Dress) साड्या नेसत आहेत. एअर इंडियाच्या फ्लाइट अटेंडंट्स गेल्या सहा दशकांपासून सहा वारी साडी नेसून प्रवाशांच्या सेवेत आहेत. पण, आता काळाप्रमाणे, समकालिन आणि आधुनिक पोशाखाकडे वळलं पाहिजे, असं अधिकाऱ्यांनी म्हटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस एअर इंडिया नव्या पोशाखांबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपर्यंत एअर इंडिया नवीन गणवेश लागू करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


नवा गणवेश कसा असेल?


एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सच्या नव्या गणवेशातून साडी हद्दपार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश पारंपारिक असेल. महिलांसाठी चुडीदार सारखा पर्याय विचारात घेतला जात आहे. तर पुरुषांसाठी सूट असेल. या वर्षाच्या अखेरीस एअर इंडिया नव्या पोशाखांबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपर्यंत एअर इंडिया नवीन गणवेश लागू करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


नव्या गणवेशातून साडी हद्दपार होणार?


हिंदु्स्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, डिझायनर मनीष मल्होत्रा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेश डिझाईन करत आहे. डिझायनर मनीष मल्होत्राकडून क्रू मेंबर्सचा गणवेश कसा असेल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन गणवेशामध्ये अजूनही पारंपारिक पर्याय असतील. रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याने दावा केला की, क्रू मेंबर्ससाठी साड्या पूर्णपणे बंद केल्या जाणार नाहीत. विविध पर्याय कायम ठेवले जातील. 


सुत्रांच्या माहितीनुसार, “विमान एअर इंडिया कंपनीला गणवेशासाठी विविध पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायांमध्ये साडी सारख्या दिसणाऱ्या पण पारंपारिक साड्यांप्रमाणे नेसाव्या न लागणाऱ्या म्हणजेच रेडी-टू-वेअर साड्यांचाही पर्याय देण्यात आलेला आहे. याशिवाय चुडीचार प्रमाणे इतर पर्यायही देण्यात आले आहेत. एअर इंडिया कंपनी विविध पर्यायांमधून गणवेशांची निवड केली जाईल.