नवी दिल्ली : नव्या संसदेत (New Parliament) मुहूर्त शोधून कामकाजाचा शुभारंभ तर झाला. पण याच नव्या संसदेत भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांच्या अभद्र भाषेनं चांगलाच गदारोळ निर्माण झालाय. एकीकडे या विधानावरुन भाजपनं (BJP) बिधुरी यांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे भाजपचेच खासदार बिधुरी यांच्या बचावासाठी धावताना दिसतायत, लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिताना दिसत आहेत.
संसदेत अभद्र भाषा वापरणाऱ्या भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई होणार की नाही..या प्रश्नाची चर्चा सुरु असताना दोन्ही बाजूंनी पत्रकबाजी सुरु झाली आहे. लोकसभा अध्यक्षांसमोर दोन्ही बाजूंचे खासदार वेगवेगळी बाजू मांडत आहेत. भाजपचे निशिकांत दुबे, रविकिशन हे दोन खासदार बिधुरी यांच्या बचावाला धावले. दानिश अली यांनी सुरुवात केली, त्यांनी उकसावणारे शब्द वापरले त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली आहे.
रमेश बिधुरी यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही
रमेश बिधुरी यांनी ज्यांच्याविरोधात अपशब्द वापरले ते दानिश अली हे बसपाचे खासदार आहेत पण या प्रकरणात बसपापेक्षा इतरच पक्ष जास्त आक्रमक आहेत. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, तृणमूलच्या अपूर्वा पोद्दार, डीएमकेच्या कनिमोळी, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकसभा अध्यक्षांना या प्रकरणात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. दानिश अली यांच्या नेत्या आहेत मायावती. मायावतींनीही अजून दानिश अली यांची भेट घेतलेली नाही. त्याआधी राहुल गांधी दानिश अली यांच्या भेटीला पोहचले. दुसरीकडे इतके अपशब्द वापरुनही रमेश बिधुरी हे बिनधास्त आहेत. या सगळ्या वादानंतर आपल्या वक्तव्याबद्दल त्यांना जराही दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली नाही. अध्यक्ष आपलं काम करतील असंच ते म्हणालेत.
बिधुरी यांच्या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीका होऊ लागल्यानंतर भाजपनंही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 15 दिवसांत उत्तरासाठी वेळ दिला आहे. पण दुसरीकडे भाजपचेच खासदार एकापाठोपाठ एक बचावासाठी धावतायत. लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहितायत. त्यामुळे आता नव्या संसदेत इतक्या अपशब्दांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला लाज आणणाऱ्या बिधुरी यांच्यावर काही कारवाई होते की दानिश अली यांनाच जबाबदार ठरवलं जातं हे पाहावं लागेल.
शिव्यांची लाखोली वाहिलेला व्हिडीओ व्हायरल
लोकसभेच्या कामकाजादरम्यान दिल्ली भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपचे दानिश अली यांना 'दहशतवादी' म्हणून संबोधले. रमेश बिधुरी यांनी अनेक शिव्यांची लाखोली भर संसदेत वाहिली. संसदेत महिला खासदार बाजूला आहेत याचंही त्यांना भान राहिलं नाही. लोकनियुक्त खासदाराला भर संसदेत शिव्यांची लाखोली वाहिलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा :
Supriya Sule On Ramesh Bidhuri:रमेश बिधुरींच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावासाठी सुप्रिया सुळेंची नोटीस