नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारामध्ये शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत.


12 ते 21 ऑगस्ट या कालावधीत मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 12 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या मंत्र्यांची निवड करतील.

विशेष म्हणजे अमित शाह केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. 2019 लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाध्यक्षाची भूमिका शाह सांभाळतील. अमित शाह राज्यसभेवर निवडून जाण्याच्या वृत्तानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

12 जणांमध्ये 9 जण भाजपचे असतील, तर मित्रपक्षातील तिघांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. या तिघांपैकी एक
मंत्रिपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्यामुळे शिवसेनेला मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

संरक्षण, पर्यावरण, नागरी विकास, माहिती आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये नव्या चेहऱ्यांची वर्णी लागू शकते. त्याचप्रमाणे जेडीयूही मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात दिसू शकतं.

दोघा मंत्र्यांची पदोन्नती होण्याची चिन्हं आहेत. काही मंत्र्यांचे विभाग बदलले जाऊ शकतात, तर काही जणांना
मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. बिहारमधून काही जणांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, तर कर्नाटकमधून काही चेहऱ्यांनाही स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधानांनी रिपोर्टकार्ड तयार करायला सुरुवात केली आहे. सरकारमधील कामकाजाच्या आधारावर मंत्र्यांचं मूल्यांकन करण्यात येत आहे.