बिहारमधील मोकामा स्थानकाजवळ एका प्रवाशानं रेल्वेच्या पँट्रीकारमधून व्हेज बिर्यानी मागवली. पण त्यामध्ये त्याला चक्क पाल सापडली.
जेवणात पाल सापडताच या रेल्वे प्रवाशानं बक्सर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे मंत्रालयाला यांना याबाबतची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यानंतर मुगलसराय स्टेशनवर ट्रेन पोहचताच डीआरएमसह अनेक अधिकारी या प्रवाशाची चौकशी करण्यासाठी तात्काळ पोहचले. तसेच त्याला योग्य औषधही देण्यात आलं आणि त्यानंतरच ट्रेन रवाना करण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रेल्वेमध्ये मिळणाऱ्या पदार्थांबद्दल सीएजीनं एक धक्कादायक अहवाल सादर केला होता. सीएजीनं आपल्या अहवालात असं म्हटलं होतं की, रेल्वेमध्ये मिळणारे पदार्थ हे बऱ्याचदा अस्वच्छ पद्धतीनं तयार केलेले असतात. अनेकदा तक्रारी करुनही रेल्वेतील खाद्यपदार्थांमध्ये सुधारणा झालेली नाही.