नवी दिल्ली : येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद केले जातील, आता प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस व्यवस्था बसवण्यात येणार असून त्या आधारे टोलची वसूली करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासामध्ये खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. 


केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "या आधीच्या सरकारांनी अनेक ठिकाणी, अनेक शहरांत अन्यायी पद्धतीने टोलनाके बसवले. त्या आधारे टोल चोरी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यामुळे येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील. आता टोल वसूलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रत्येक गाडीमध्ये GPS Tracker लावण्यात येणार आहे. त्यामुळे जेवढा प्रवास केला जाईल तेवढाच टोल आता आकारण्यात येणार आहे."


या आधी डिसेंबरमध्ये या योजनेची माहिती देताना गडकरी म्हणाले होते की, "येत्या दोन वर्षांत भारत टोल व अडथळ्यांपासून मुक्त होणार आहे. सरकार यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली आणणार आहे. येत्या दोन वर्षांत वाहनांचा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातूनच वजा केला जाणार आहे. टोलसाठी जीपीएस प्रणालीचे काम चालू आहे, ज्यामध्ये प्रवास केलेल्या अंतरावरुन टोल आपोआपच बँक खात्यातून वजा करण्यात येईल."


रशियन सरकारच्या मदतीने आम्ही लवकरच जीपीएस (GPS) सिस्टमचे काम पूर्ण करू असे सांगताना गडकरी म्हणाले होते की, "ही योजना अंमलात आणल्यानंतर दोन वर्षांत भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल. यावेळी देशातील सर्व व्यावसायिक वाहने ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहेत. त्याचबरोबर सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम तंत्रज्ञान बसविण्यासाठी सरकार वेगाने काम करेल. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने वाहनांचा मुक्त संचाराकरीता टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केला आहे. फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर इंधन बचत होत असून प्रदुषणही कमी झाले आहे."


गडकरींच्या या घोषणेमुळे आता टोल नाक्यावर टोल भरण्यासाठीच्या भल्यामोठ्या रांगेपासून प्रवाशांची सूटका होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही वाचणार आहे. 


संबंधित बातम्या :