मुंबई :  उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.रिप्‍ड जीन्स संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्यानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. नव्या नंदानं आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी.  


नव्यानं सोशल मीडियावर तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा स्‍क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे की,  WTF, आमचे कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी. तिनं म्हटलं आहे की, मी अभिमानानं रिप्ड जीन्स घालणार आहे. तिनं पुढं म्हटलं आहे की, मुख्यमंत्री आम्हाला चांगलं वातावरण देऊ शकतात का? एक फोटो शेअर करत तिनं म्हटलं आहे की, मी माझी रिप्‍ड जीन्स पहनूंगी, धन्यवाद. आणि मी या जीन्सला अभिमानानं घालणार, असंही तिनं म्हटलंय. 


'गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातलेल्या महिला काय संस्कार देणार?' उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य


काय म्हणाले उत्तराखंडचे मुख्यमंत्री 
उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेली जीन्स पाहून मनात प्रश्न येतो की यामुळं समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतात, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असं तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे. तीरथ सिंह रावत म्हणाले की, ''मी जयपूरला एका कार्यक्रमासाठी जात होतो. जहाजातून प्रवास करत असताना तिथे एक महिला आपल्या 2 मुलांसोबत होती आणि तिने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातली होती. मी जेव्हा तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. मी एक स्वयंसेवी संस्था चालवते, असं तीनं मला सांगितलं, असं तीरथ सिंह रावत म्हणाले.  रावत म्हणाले की, तेव्हा मी विचार केला की, जर स्वयंसेवी संस्थाचालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल? आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं कधीच नसायचं, असंही तीरथ सिंह यांनी म्हटलं आहे. तीरथ सिंह म्हणाले की, आजकाल फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते, असं ते म्हणाले. ते म्हणाले की,  आपण जसं वागतो, त्याचंच लहान मुलं अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. आपण कितीही पुढारलेलो असलो तरी चांगले संस्कार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही, असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले.


तीरथ सिंह रावत यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागावी -  प्रियांका चतुर्वेदी 
दरम्यान तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.  संस्काराच्या गोष्टी करणाऱ्या या लोकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत कधी बोलणार असा सवाल देखील चतुर्वेदी यांनी केला आहे. आज महिलांना सुरक्षा हे लोक देऊ शकत नाहीत, त्यांनी आधी देशातील महिलांना सुरक्षा देण्याचं पाहावं, असंही त्या म्हणाल्या.