नवी दिल्ली : केंद्र सरकारनं कालच जाहीर केलेल्या भारतमाला प्रकल्पातंर्गत जे रस्ते बांधण्यात येणार आहेत, त्यात महाराष्ट्राच्या वाट्यालाही अनेक रस्ते येणार आहेत. दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भात माहिती दिली.
भारतमाला प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 60 हजार किमीच्या रस्त्यांसाठी 5 लाख 35 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा लगेचच सुरु होणार असून, हे काम 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.
संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, देशाच्या सीमा आणि सागरी किनारपट्टी क्षेत्र (कोस्टल एरिया) आदीमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातंर्गत अपूर्ण आंतराराष्ट्रीय प्रकल्पही पूर्ण करण्यात येणार आहेत.
भारतमाला प्रकल्पाअंतर्गत पश्चिम आणि पूर्ण सीमांदरम्यान 3300 किमी रस्ते बांधण्यात येणार आहेत. लुधियाना-अजमेर आणि मुंबई- कोचीदरम्यान नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येणार आहे.
लुधियाना-अजमेर महामार्गातील प्रस्तावित महामार्गाचं प्रस्तावित अंतर 721 किमी असणार आहे. पण यामुळे दोन्ही शहरातील अंतर पूर्ण करण्यासाठी 9 तास 15 मिनिट लागणार आहे. सध्याच्या 627 किमी मार्गावरुन प्रवास करण्यास 10 तासाचा अवधी लागतो.
याशिवाय, मुंबई-कोची महामार्गातील प्रस्तावित अंतर 200 किमीनं वाढणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील अंतर पाच तासांनी कमी होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- भारतमाला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्या महामार्गांची बांधणी करण्यात येणार आहे.
- यामध्ये देशाच्या सीमा, आतंरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचे विकासप्रकल्पांचाही समावेश आहे
- तसेच या अंतर्गत नवनवीन नॅशनल कॉरिडॉर्स उभारण्यात येतील.
- दुर्गम भाग आणि पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा नवे महामार्ग बांधले जातील.
- चारधाम, केदारनाथ,बद्रीनाथ, यमुदनोत्री, आणि गंगोत्री आदी धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येईल.
महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
- महाराष्ट्रात मुंबई-वडोदा 420 किमीचा महामार्ग तयार करण्यात येईल
- किनारपट्टी क्षेत्रासाठी (कोस्टल एरिया) दिघी पोर्ट-दाभोळ-गुहागर-जयगड पोर्ट-मालवण-वेंगुर्ला-आरोंदा दरम्यान 445 किमीचा महामार्ग विकसित होणार आहे.
- मुंबई -कोलकाता दरम्यान 1854 किमीचा आणि मुंबई-कन्याकुमारी दरम्यान 1619 किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधला जाईल.
- तसेच सोलापूर-नागपूर, सोलापूर-गुटी, औरंगाबाद-हैदराबाद आदी इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारले जातील.
- शिवाय पुणे, धुळे, सोलापूर, नागपूर आदी शहरामध्येही रिंग रोडसाठीचा प्रस्तावाला या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार असून, हे काम 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असल्याचंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.