नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कथित स्वामी नित्यानंदने स्वत:च्या मालकीचा देश जाहीर केलेल्या 'कैलासा'वर भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारत, ब्राझिल, मलेशिया आणि युरोपियन युनियनमधील प्रवाशांनी कैलासावर येऊ नये असं त्याने सांगितलं आहे.
कैलासाच्या अध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय कैलासाच्या सेवेत असलेल्या जगातील सर्व राजदूतांसाठी असल्याचंही त्याने सांगितलं आहे. या संबंधी 19 एप्रिलला एक निवेदन प्रसिध्द करण्यात आलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की कैलासातील सर्व स्वयंसेवक, कर्मचारी आणि संबंधित सर्वजण हे क्वॉरन्टाईन आहेत आणि सावधगीरीचा उपाय म्हणून त्यांना कैलासातील सर्व नियम पाळणे अत्यावश्यक आहे.
भारतात लैंगिक शोषणाचा आरोप
भारतात लैंगिक शोषणाचा आरोप असलेला नित्यानंद हा 2019 साली देशातून फरार होऊन इक्वेडोरच्या एका बेटावर जाऊन लपला आहे. त्या बेटावर त्याने आपलं बस्तान मांडलं असून कैलासा या नव्या देशाला मान्यता मिळावी म्हणून संयुक्त राष्ट्राकडे अनेक वेळा मागणी केली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये नित्यानंदने आपल्या स्वत:च्या मालकीच्या रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा ची स्थापना केली आणि कैलाशियन डॉलर चलनाचीही घोषणा केली.
नित्यानंद हा 'कैलासा' ला एक स्वतंत्र्य देश मानतो आणि आपण त्याचे सर्वेसर्वा असल्याचा दावा करतो. या देशाच्या माध्यमातून आपण हिंदू धर्माचा प्रसार करत असल्याचा दावाही तो करतो.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus in India : कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आज तीन महत्त्वाच्या बैठका, राज्यांचे मुख्यमंत्री, ऑक्सिजन निर्मात्यांशी बातचित
- Corona Vaccination Registration: येत्या 24 एप्रिलपासून लसीकरणासाठी 18 वर्षांवरील सर्वांना नोंदणी करता येणार
- Corona | भारत सरकारच्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी Pfizer ची 'ना नफा' तत्वावर लस पुरवण्याची ऑफर