नवी दिल्ली : पुढच्या महिन्यापासून निसान इंडिया आणि टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. कंपनीनेच याबद्दल माहिती दिली. वाढता खर्च पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 1 एप्रिलपासून वाहनांच्या किंमतीत 60 हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.


‘भाषा’च्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या श्रेणीत 2.28 लाख रुपयांच्या जेनएक्स नॅनोपासून ते 17.42 लाख रुपयांच्या SUV हेक्साचाही समावेश आहे.

वाढता खर्च आणि बाजारातील बदलती परिस्थिती पाहता किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती टाटा मोटर्सचे अध्यक्ष (प्रवासी वाहन) मयंक पारीक यांनी दिली.

याचप्रमाणे निसानही भारतात आपल्या वाहनांच्या किंमतीत पुढच्या महिन्यापासून 2 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. निसानची मायक्रा, सनी आणि टेरानो हे तीन मॉडल सध्या भारतात आहेत. ज्याची किंमत 4.64 लाख रुपयांपासून ते 14.46 लाख रुपयांपर्यंत आहे. तर डॅट्सनच्या गो, गो प्लस आणि रेडी गो या वाहनांची किंमत 2.49 रुपयांपासून ते 5.12 लाख रुपयांपर्यंत आहे.

दरम्यान, वाहनांच्या किंमती वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या आठवड्यात ऑडीनेही कारच्या किंमती 1 लाख रुपये ते 9 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. या वाढलेल्या किंमती 1 एप्रिलपासून लागू होतील.