मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह यांची वर्णी नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये लागली आहे. शाह यांना मोदींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळणं निश्चित आहे. गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र या अग्रणीच्या खात्यांपैकी अर्थ मंत्रालयाची धुरा अमित शाह यांच्याकडे सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारचं खातेवाटप होण्यापूर्वी कोणाला कोणती जबाबदारी मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. राजनाथ यांना पुन्हा गृह मंत्रालय मिळणं निश्चित मानलं जात असताना अमित शाह यांची वर्णी अर्थमंत्रिपदी लागण्याची चिन्हं आहेत.

वैद्यकीय कारणामुळे गेल्या वेळी अरुण जेटली यांच्या अर्थ मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. जेटलींना यंदा कोणतंही खातं सोपवलं जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे. अमित शाह यांना गुजरातमध्ये मंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यांना देशाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राची जाण आहे. त्यामुळे जेटलींऐवजी शाह देशाचे नवे अर्थमंत्री होऊ शकतात.



अमित शाह 2014 पासून भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी यंदा गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. तब्बल 5.57 लाखांच्या मोठ्या मताधिक्याने अमित शाह यांनी काँग्रेस उमेदवार सी जे चावडा यांचा पराभव केला. 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड विधानसभा निवडणुका, पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळवून देण्यात शाह यांचा महत्वाचा वाटा आहे.

परराष्ट्र मंत्रालय कोणाकडे?

संरक्षण मंत्रिपदी निर्मला सीतारमण यांची पुनर्नियुक्ती जवळपास निश्चित आहे. तर सुषमा स्वराज यांची मंत्रिपदी वर्णी लागली नसल्याने त्यांच्या परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणत्या नेत्याकडे सोपवली जाणार, याची उत्सुकता आहे. निवृत्त परराष्ट्र सचिव सुब्रह्मण्यम जयशंकर यांची निवड परराष्ट्र मंत्रिपदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय नितीन गडकरी, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे यांच्या खात्यांबाबतही उत्सुकता आहे.

भाजपाध्यक्षपद कोणाला?

अमित शाह दुहेरी जबाबदारी पेलण्याऐवजी अध्यक्षपदाची खुर्ची एखाद्या विश्वासू नेत्यावर सोपवण्याची चिन्हं आहेत. मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणाऱ्या जे पी नड्डा यांच्याकडे यंदा कोणतंही मंत्रालय सोपवण्यात आलेलं नाही. त्यामुळे जे पी नड्डा यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. जे पी नड्डा हे हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर खासदार आहेत. ते भाजपच्या संसदीय बोर्डाचाही भाग होते.