नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी दोषी अक्षय ठाकूरची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अक्षयची फेरविचार याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती आर. भानूमती, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने याप्रकरणी आज सुनावणी घेतली होती. या खंडपीठाने अक्षय ठाकूरची फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणी चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. अक्षयच्या बाजूने वकील ए. पी. सिंह यांनी कोर्टाला अक्षयला फाशीची शिक्षा देऊ नका, अशी विनंती केली होती.
न्यायमूर्ती भानूमती फैसला सुनावताना म्हणाल्या की, याचिकाकर्त्याने संबंधित खटल्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. याचिकार्त्याने तपास पूर्ण झाला नसल्याचा दावा केला आहे. परंतु यावर कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सुनावाणी केली आहे. त्याच-त्याच गोष्टींवर पुन्हा सुनावणी घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळे हे कोर्ट फेरविचार याचिका फेटाळत आहे.
'दिल्लीत वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे, येथील पाणीही विषारी झालं आहे, यामुळे आयुष्य आधीच कमी होत आहे. अशातच फाशी देऊन माझं आयुष्य का कमी करताय?' असा प्रश्न निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयने उपस्थित केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने यासाठी त्याने वेद, पुराण, उपनिषद यांसारख्या ग्रंथांचाही हवाला दिला होता. धार्मिक ग्रंथांनुसार, सतयुग आणि त्रेतायुगात लोक हजारो वर्ष जगू शकत होती. पण कलियुगात माणूस जेमतेम 50 वर्षच जगतो. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची गरज काय? असा अजब दावा त्याने केला होता. दरम्यान, याप्रकरणातील इतर तीन जणांच्या याचिका न्यायालयाने आधीच फेटाळून लावल्या आहेत.
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर, दिल्लीतील निर्भया गँगरेपच्या दोषींना फासावर कधी लटकावणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता निर्भयाच्या सर्व दोषींना फासावर लटकवण्यासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. येते एक-दोन आठवड्यात निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
इतर तीन दोषींची याचिका न्यायलयाने फेटाळली
9 जुलै 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील इतर तीन दोषी मुकेश, विनय आणि पवन यांची याचिका फेटाळली होती. त्यावेळी न्यायालयाने सांगितले होते की, दोषींनी समोर ठेवलेल्या बाबींमधून निर्णय बदलण्याची गरज वाटली नाही. त्यावेळी अक्षयने याचिका दाखल केली नव्हती. दरम्यान, 5 मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता अक्षयने फाशीच्या शिक्षेवर फेरविचार करण्याबाबत याचिका दाखल केली आहे.
Nirbhaya Gang Rape | दोषी अक्षय ठाकूरची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Dec 2019 02:33 PM (IST)
निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषी अक्षय ठाकूरने फाशीच्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल केली होती. त्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -