निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना उद्या फासावर लटकवलं जाण्याची शक्यता आहे. दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीय. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पवन गुप्ताने या क्युरेटिव्ह याचिकेत केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलीय. क्युरेटिव्ह याचिका फेटाळली तरी त्याच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्याला ही दया याचिकाही तीन मार्चपूर्वी अर्थात आजच दाखल करावी लागेल. कायद्यानुसार, दया याचिका दाखल केलेल्या कोणत्याही दोषीला ती फेटाळण्यात येईपर्यंत फासावर चढवता येत नाही. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर 14 दिवसांनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे पवननं दया याचिका दाखल केली तर ती फेटाळून त्याला फासावर चढवण्यासाठी 20 मार्चचा दिवस उजाडू शकतो. त्यामुळे आता निर्भयाच्या चारही दोषींना उद्या फासावर लटकवलं जाणार की फाशीची नवीन तारीख समोर येणार याकडं नजरा लागल्यात.
Nirbhaya Case : दोषींची फाशी लांबत असल्यानं निर्भयाच्या आईचा कोर्टातच बांध फुटला
चारही दोषींना उद्याच फाशी होण्याची शक्यता -
मुकेश कुमार सिंह(वय 32), पवन गुप्ता(25), विनय कुमार शर्मा(26) आणि अक्षय कुमार(31) अशी या दोषींची नावं आहेत. आपल्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचा दावा दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी केलाय. दोषींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, अक्षयसाठी ते नवी दया याचिका करणार आहेत. तर, पवनकडेही राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
निर्भयाच्या आई-वडिलांनी 11 फेब्रुवारीला दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये 22 जानेवारीला दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा एक फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयानं 31 जानेवारीला एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती.
काय होती घटना -
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तिला आणि त्याच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं. नंतर पोलिसांनी निर्भयाला रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. 29 डिसेंबर 2012 रोजी, सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निर्भयाचा मृत्यू झाला. एक सप्टेंबर 2013 रोजी कनिष्ठ कोर्टाने चार दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश आणि अक्षय सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
Nirbhaya Rapist Death Sentence | दिल्ली निर्भया बलात्काराप्रकरणी चारही दोषींना एकत्र फाशी देणार - दिल्ली हायकोर्ट