नवी दिल्ली : केंद्र सरकारने होळीच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करुन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.  14.2 किलोचा विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 53 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात होऊन आता अनुक्रमे 805.50 रुपये, 839.50 रुपये, 776.50 रुपये आणि 826 रुपयांना मिळणार आहे. चारही मेट्रो सिटीमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचे दर अनुक्रमे 53 रुपये, 56.50 रुपये, 53 रुपये आणि 55 रुपये झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मार्च महिन्यात एलपीजी सिलेंडरचे दर कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्याप्रमाणे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 मार्च रोजी विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर मार्च महिन्यात कमी होतील : धर्मेंद्र प्रधान

याआधी दिल्ली विधानसभा निवडणूक संपल्यानंतर 12 फेब्रुवारी 2020 रोजी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. वाढलेल्या दरांनंतर या मेट्रो सिटीमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर अनुक्रमे 858.50 रुपये, 896 रुपये, 829.50 रुपये आणि 881 रुपये झाले होते.

पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या एलीपीजी सिलेंडरच्या दरातही कपात केली आहे. दिल्लीमध्ये 19 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 84.50 रुपये, कोलकातामध्ये 90.50 रुपये, मुंबईत 85 रुपये आणि चेन्नईमध्ये 88 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात होऊन दिल्लीत 1,381.50 रुपये, कोलकातामध्ये 1,450 रुपये, मुंबई 1,331 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,501.50 रुपयांनी मिळणार आहे.