Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन (Bullet Train Project) धावणार आहे. यासाठी देशात पहिल्यांदा समुद्रतळाशी बोगदा (Tunnel) उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग (Undergroud Tunnel) बांधण्यात येणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडने (NHSRCL) यासाठी निविदा मागवल्या आहेत. समुद्राच्या तळाशी बांधण्यात येणारा हा भुयारी मार्ग 7 किलोमीटर लांबीचा असेल. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी (Mumbai-Ahmedabad High Speed ​​Rail Corridor) 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामधील सात किलोमीटर भुयारी मार्ग समुद्राच्या तळाशी असेल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशनने यासाठी टेंडरही (Tender) मागवले आहेत. 


बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांला गती मिळाली आहे. सरकार बदलल्यानंतर  मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरचं काम वेगानं सुरु झालं आहे. यासाठी नव्याने टेंडरही मागवण्यात आले आहेत. ठाण्यातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग बांधण्यात येईल. 


देशातील पहिला समुद्राच्या तळाशी असणारा भुयारी मार्ग


समुद्राखालील सात किलोमीटर लांबीचा बोगदा हा देशातील समुद्राखाली बांधला जाणारा पहिला बोगदा असेल. निविदेतील कागदपत्रांनुसार, टनेल बोरिंग मशीन (TBM) आणि 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' (NTM) वापरून बोगदा बांधण्यात येणार आहे. देशातला समुद्राखालील पहिला भुयारी मार्ग मुंबईत होणार आहे. बुलेट ट्रेनच्या समुद्राखाली काढण्यात येणाऱ्या भुयारी मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. बीकेसी ते शिळफाटा दरम्यान सात किलोमीटरचा हा बोगदा समुद्राखालून जाणार आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण 21 किमीचा भुयारी मार्ग असेल. त्यातला सात किलोमीटरचा मार्ग समुद्राखालून जाईल. पारसिक टेकडीखाली 114 मीटर खाली हा भुयारी मार्ग करण्यात येणार आहे.


25 ते 65 मीटर खोल असेल बोगदा 


NHSRCL च्या मते, हा समुद्री बोगदा 13.1 मीटर व्यासाचा आणि 'सिंगल-ट्यूब ट्विन-ट्रॅक' असेल. या विभागात बोगद्याला लागून असलेल्या 37 ठिकाणी 39 इन्स्ट्रुमेंट रूम बांधण्यात येणार आहेत. सुमारे 16 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यासाठी तीन टनल बोरिंग मशीन (TBM) वापरण्यात येतील आणि उर्वरित पाच किलोमीटर मार्ग न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM) मशीनचा उपयोग करुन बांधला जाईल. हा बोगदा जमिनीच्या खाली सुमारे 25 ते 65 मीटर खोल असेल. या बोगद्याचं सर्वात खोल बांधकाम शिळफाटाजवळ असेल. शिळफाटाजवळील पारसिक टेकडीच्या खाली 114 मीटर असेल.