नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी मीडिया ब्रॉडकास्टर्स संस्था असलेल्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (NBA) आपले नाव बदलले असून ते आता न्यूज ब्रॉडकास्टर्स डिजिटल असोसिएशन (NBDA) असं असणार आहे. त्यामुळे आता डिजिटल बातम्या प्रसारित करणारी माध्यमं म्हणजे डिजिटल मीडिया न्यूज ब्रॉडकास्टर्सही या संस्थेच्या कार्यकक्षेत येणार आहेत. न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने शुक्रवारी ही घोषणा केली. 


न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी ही घोषणा करताना सांगितलं की, " एनबीएने आता आपल्या कार्यकक्षेत डिजिटल मीडिया न्यूज ब्रॉडकास्टर्सना आणण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे एनबीए बोर्डने आपल्या नावात बदल केला असून ते आता एनबीडीए या नावाने ओळखलं जाणार आहे." 


रजत शर्मा  पुढे म्हणाले की, "येत्या काळात एनबीडीए ही संस्था ब्रॉडकास्टर्स आणि डिजिटल मीडिया या दोघांचाही एक बुलंद आवाज म्हणून अधिक भक्कमपणे काम करेल असा मला विश्वास आहे. व्यावसायिक आणि इतर नियमित स्वरुपाच्या कामासोबतच ही संस्था राज्यघटनेने प्रदान केलेल्या माध्यमांच्या मूलभूत अधिकारांचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करेल."


न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन ही देशातील  प्रमुख वृत्तवाहिन्यांची एक स्वतंत्र्य स्व- नियामक संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत देशातील 80 टक्के न्यूज व्हिव्हर्स कव्हर होतात. सध्या माध्यमांमधील बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकांना व्यापक पर्याय निर्माण झाले आहेत. डिजिटल मीडिया हे माध्यमांची पुढची क्रांती असून त्याला मोठं भविष्य असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे या डिजिटल मीडियाला या संस्थेच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने आपले नाव बदलले असून ते न्यूज ब्रॉडकास्टर्स डिजिटल असोसिएशन असं केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :