अहमदाबाद : अहमदाबादमधल्या सरकारी रुग्णालयात 24 तासांत 9  नवजात बाळांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. या 9 मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट असून सर्व बाळांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.


सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 9 पैकी 5 बाळं ही दुर्गम भागातील रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. या बाळांचं जन्मत:च वजन कमी होतं.  तर 4 बाळांचा जन्म याच रुग्णालयात झाला होता.

अधिक माहितीनुसार, मृत बाळांपैकी पाच बाळांना हायलीन मेम्ब्रेन डिसीज (श्वसनासंदर्भातील आजार), सेप्टीसीमिया (रक्तातील संक्रमण), आणि डिसेमिनटेड इंट्रावस्कुलर कोएगुलेशनसारखे गंभीर आजार झाला होते. तर सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना अस्थमा आणि मेकोनियसम एस्पिरेशनसारखे गंभीर आजार झाले होते.

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसात 18 बाळांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाचे उप संचालक आर. के. दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, या घटनेचा सखोल तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणावर आरोग्य विभागाचे मुख्य सचिव जयंती रवी यांनी सांगितलं की, "दिवाळीमुळे काही डॉक्टर सुट्टीवर असल्याने दुर्गम भागातील नवजात बाळांना रुग्णालयात घेऊन यावं लागलं. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा."

दरम्यान, या घटनेनंतर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं राज्य सरकारवर निशाणा साधत रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.